राजधानी ते राजधानी


राजधानी ते राजधानी म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगड ते दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड ट्रेक व्हाया तोरणा.
आयुष्यात एकदा तरी हा ट्रेक करावा हे प्रत्येक भटक्याचं स्वप्नं असतं तसंच ते आमचं सुद्धा होतं पण तो योग या कोरोना महामारीच्या २०२० मध्ये जुळून येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.

आमच्या ध्यानी-मनी नसतांना सरत्या दिवाळीत रोह्याच्या शुभम चा मेसेज आला की डिसेंबर मध्ये राजगड-तोरणा-रायगड करायचा. हो नाही करत रोह्यातून शुभम, संकेत आणि आदर्श तर मुंबई मधून मी, प्रणव आणि योगेश असं ६ जणांचं जायचं नक्की झालं आणि तयारी सुरू केली. इतका मोठा पल्ला गाठायचा म्हणजे हाताशी ३ दिवस हवेत आणि तशी ३ दिवसाची सुट्टी २५-२६-२७ डिसेंबर ला आयती चालून आलेली.

२६ तारीख च्या सुट्टीचं कन्फर्म झालं आणि झाडावरून पान अलगद खाली पडावं तसं "२७ तारीख ला माझं pre-wedding शूट आहे" सांगून योगेश अलगद बाजूला झाला. सदस्यसंख्या ६ वरून ५ वर आली. बोराटा नाळ की सिंगापूर नाळ या चर्चेत २ दिवस गेले. शेवटी सर्वानुमते बोराटा नाळेने उतरायचं ठरलं.  ३ दिवसाच्या जेवणाचं साहित्य सोबत न्यायचं ठरलं होतं पण ते खुपचं त्रासदायक होणार होतं म्हणून जिथं रात्री मुक्कामाला जाऊ तिथल्या गावात जेवण करू आणि सकाळच्या आणि संध्याकाळच्या चहासाठी लागणारं सामान, दुपारच्या जेवणासाठी मॅगी, सूप, थेपले असं हलकं फुलकं घेऊन जाऊ असं ठरलं.

ब्लॉग्स, व्हिडिओ आणि जाणकारांच्या मार्गदर्शनाने जमेल तितकी माहिती गोळा करत होतो. कधी निघायचं? कुठून कुठे जायचं? कधी पोहचायचं? कुठं राहायचं? हे सगळं ठरवून झालं. इतका मोठा ट्रेक जमेल की नाही याची धाकधूक तर होतीच पण त्याहून कैक पटीने त्याची उत्सुकता होती. जायची तारीख नक्की झाली आणि निघायच्या ८ दिवस आधी गळत्या पानांमध्ये रोह्याच्या संकेत ने तब्बेतीच्या कारणाने भर घातली आणि सदस्यसंख्या ५ वरून ४ वर आली. तरीपण हार नं मानता आपण ही मोहीम करूच असं ठरवलं आणि तयारी सुरू ठेवली. बऱ्याच लोकांना विचारणा सुरू होती जेणेकरून आम्हाला सदस्यसंख्या  थोडी वाढवता येईल. शेवटचे ४ दिवस बाकी असतांना मुंबईवरून कुलदीप आणि मूळचा महाड चा असणारा आणि सध्या पुण्यनगरीत असणाऱ्या अतुल ची भर पडली आणि शेवटी ६ जण या मोहिमेसाठी नक्की झालो.

मुंबई आणि ठाण्याच्या ट्राफिक मधून वाट काढत मी, प्रणव आणि कुलदीप २४ तारीखच्या रात्री ९ वाजता चांदणी चौकात उतरलो तेव्हा बाकीची मंडळी आमची वाट पाहात तिथंच उभी होती. पुढच्या पाचंच मिनिटात कात्रज चे भिलारे काका आपली ट्रॅक्स घेऊन चांदणी चौकात हजर झाले आणि आमची ६ जणांची टीम पुण्याच्या कडक थंडीतून राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गुंजवणे गावाकडे रवाना झाली. साधारण १०:३० च्या दरम्यान पाठीवरल्या भल्या मोठ्या बॅग्स सांभाळत गुंजवणे मध्ये पोहोचलो. आधीच सांगितल्या प्रमाणे अरण्यधाम हॉटेल च्या चंद्रकांत काकांनी आमची जेवणाची सोय केली होती. रात्रीच्या थंडीत त्यांच्याकडे डाळ, भात, भाजी आणि भाकरी पोटात ढकलून बरोब्बर १२ वाजता च्या गारठ्यात आम्ही चोर दरवाज्याच्या वाटेने राजगड चढायला सुरुवात केली.

पुढच्या सीटवर मी आणि कुलदीप आणि मागे प्रणव

डावीकडून उजवीकडे - शुभम, कुलदीप, त्याच्या मागे मी, प्रणव, अतुल आणि फोटोग्राफर आदर्श.

रात्रीच्या चांदण्यात न्हाऊन निघालेली पद्मावती माची आणि बालेकिल्ला डोळ्यासमोर ठेवून गप्पा मारत आम्ही राजगड सर करत होतो. पूर्ण वाटेत आम्हा सहा जणांव्यतिरिक्त कोणीही नव्हतं. आवश्यक तिथं ब्रेक घेत साधारण २ तासांनी, रेलिंग चा टप्पा पार करून चोर दरवाजा ने आम्ही गडावर प्रवेश करते झालो. थोडा आराम करायला बसलो तिथंच पोरांना नाईट फोटोग्राफी ची लहर आली. चांगला तासभर वेळ घालवून मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिरात झोपायला मिळेल अशी अपेक्षा होती पण मंदिरात सोडा पण मंदिराच्या बाहेर सुद्धा बरेच टेंट होते त्यामुळे सदरेच्या दिशेने मोर्चा वळवला. मंदिराच्या पुढेच कचेरी जवळ प्रशस्त आणि मोकळी जागा बघून तिथेच तंबू लावले आणि सकाळी ५:३० चा अलार्म लावून अर्ध्या तासांतच निद्रादेवीला शरण गेलो.



प्रोफेशनल फोटोग्राफी चा छोटासा प्रयत्न😁

सकाळी अलार्म च्या आवाजाने जाग आली आणि सोबतच आजूबाजूला लगबग जाणवली. टेंट च्या बाहेर येऊन सगळ्यांना उठवलं आणि आजूबाजूला पाहिलं तर जवळपास २०० लोक राजगड ते रायगड ट्रेक करायला आले होते. आमचं आवरेपर्यंत ७ वाजले होते आणि त्या दोनशे लोकांनी संजीवनी माचीकडे आपली चाल सुरू केली होती. वाटेत गर्दी व्हायला नको म्हणून थोडं राजगड फिरून मग संजीवनी कडे जाऊ असं ठरवलं आणि सुवेळा माचीला जाताना लागणाऱ्या नेढ्याकडे मार्गस्थ झालो.

सुवेळा माचीकडे जाणारी वाट

गुंजवणे दरवाजा, डुबा आणि सुवेळा माची

नेढ्याच्या अलीकडे एका कपारीत विराजमान श्रीगणेश

पद्मावती माचीपासून नेढ्याचे अंतर साधारण दीड किलोमीटर. कचेरी पासून निघून आणि बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची वाट उजवीकडे ठेवून सदरेच्या पुढे आलो आणि थोड्या वेळातच डाव्या बाजूला खाली गुंजवणे दरवाजा दिसला. खाली नं उतरता सुवेळा कडे चालत राहिलो आणि डुबा पार करून नेढ्याजवळ येऊन पोहोचलो. पाठीवरच्या बॅग्स खाली ठेवून सोप्या चढाईनंतर नेढ्यात आलो. वातावरण स्वच्छ असल्याने पलीकडे सिंहगड, वज्रगड आणि पुरंदर किल्ले स्पष्ट दिसत होते. तर अलीकडची सुवेळा माची आणि संजीवनी माचीची लांबी अचंबित करत होती. सुवेळाच्या उजवीकडे असलेला काळबुरुज साद घालत होता तर उंचावर असलेला बालेकिल्ला खुणावत होता.

 
नेढ्यात निवांत बसलेला शुभम

नेढ्यासमोरील तटबंदी वरून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळताना

नेढ्यात थोडी फोटोग्राफी करून खाली आलो आणि बॅग्स घेऊन बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. पण बालेकिल्ल्याकडे जाणारा वेळ बघता बराच उशीर झाला असता म्हणून बालेकिल्ला वगळून संजीवनी माचीकडे चालायला सुरुवात केली. थोडं चालून गेल्यावर कळलं की आपण संजीवनी माची सोडून पाली गावाकडे जाणाऱ्या पाली दरवाज्याकडे पोहोचलोय. अनायसे पाली दरवाजा बघायला मिळाला म्हणून खुश झालो आणि थोडा वेळ घालवून आणि फोटोग्राफी करून पुन्हा वर गडावर आलो.

पाली दरवाजातून आसपासचा प्रदेश न्याहाळताना कुलदीप.

एव्हाना नऊ वाजून गेले होते आणि थोडी भूक सुद्धा लागली होती म्हणून सदरेच्या अगदीच बाजूने संजीवनी माचीकडे जाणाऱ्या वाटेवर बसलो आणि बॅग मधून ब्रेड-जॅम-संत्री असा थोडा नाश्ता करून पुढे चालायला सुरुवात केली.

सदरेकडून संजीवनीकडे जाताना बालेकिल्ल्याचा कातळकडा डावीकडे ठेवून पुढे जात होतो. या भागात वर बऱ्याच ठिकाणी मधमाशांची पोळी होती त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत पुढे जात होतो. अर्धा तास चालून सगळे अळू दरवाज्याजवळ पोहोचलो. एव्हाना १० वाजले होते. संजीवनी माचीच्या टोकाला जायची इच्छा होती पण पुढे बराच मोठा पल्ला गाठून तोरणा सर करून भट्टी गावात उतरायचं होतं त्यामुळे डावीकडे असणाऱ्या अळू दरवाजातून बाहेर पडलो आणि तोरण्याकडे चालायला सुरुवात केली.

अळू दरवाजातून बाहेर येणारी पायवाट

राजगड ते तोरणा च्या दरम्यान असलेली डोंगररांग

अळू दरवाज्यातून बाहेर पडणारी वाट संजीवनी माचीच्या डाव्या बाजूला वळते आणि पुढं U turn घेऊन पुन्हा संजीवनीच्या टोकाखाली आणून सोडते. हा भाग म्हणजे बऱ्यापैकी मोकळे पठार होते आणि तिथून संजीवनी माचीची चिलखती तटबंदी सुरेख दिसत होती. संजीवनी माचीला वळसा घालून मळलेल्या वाटेने आम्ही तोरण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात वाट उतरणीला लागली आणि छोटा कातळतप्पा आणि घसारा सावकाश उतरून खाली आलो. इथून पुन्हा वाट वर चढत होती. सुरुवातीला दोन्ही बाजूला असलेलं कारवीचं जंगल पुढे विरळ होत गेलं आणि भर उन्हातून आम्ही ६ टाळकी तोरण्याच्या दिशेने चालत होतो. गरज वाटेल तिथं ब्रेक घेत आमची वाटचाल सुरू होती. सोबत आणलेल्या लिमलेट च्या गोळ्यांमुळे कमीतकमी पाणी पीत होतो त्यामुळे बऱ्यापैकी पाणी जवळ होतं. ३-४ टेकड्या चढ-उतार करून झाल्या असतील तेव्हा कुलदीप आमच्या थोडं पुढे निघून गेला होता पण दृष्टीक्षेपात होता. साधारण पाच-एक मिनिटांत वाटेला २ फाटे फुटले. एक वाट उजवीकडे उतरत होती तर दुसरी सरळ जात होती. सरळ जाणाऱ्या वाटेवर थोडं पुढे SRT लिहून बाण मारला होता त्यामुळे हीच वाट असल्याची खात्री झाली पण कुलदीप नक्की कोणत्या वाटेने गेला हे कळायला काहीच मार्ग नव्हता त्यामुळे नक्की काय करायचं ते कळत नव्हतं. त्याच्या नावाने हाका मारून बघितल्या पण प्रतिसाद शून्य. सरळ वाटेने पुढे जाऊन बघू आणि पुढे नाहीच भेटला तर एका-दोघांनी पुन्हा मागे येऊन उजवीकडच्या वाटेने उतरून त्याला शोधायचं असं ठरलं. सरळ जाताना थोड्याच वेळात वाट खाली उतरली आणि डांबरी रस्त्याला येऊन मिळाली. किंचित उजवीकडे गेल्यावर डाव्या बाजूच्या जंगलात तोरणाकडे असं एका ठिकाणी लिहिलेलं होतं. इथं येऊन पाहतो तरी कुलदीप चा पत्ता नाही. सहज म्हणून एकदा हाक मारली तर तोरणाच्या वाटेजवळून आवाज आला. जाऊन पाहिलं तर शेटनी मस्तपैकी पडी टाकली होती. कोणीही नं ठरवता साधारण १५ मिनिटांचा ब्रेक घेतला गेला. थोडीफार संत्री खाऊन पुढची वाट धरली कारण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा होता.



तोरणाच्या वाटेवरून मागच्या बाजूला दिसणारा राजगड

इथून पुन्हा छोट्या-मोठ्या टेकड्या पार करत आमची तोरण्याकडे वाटचाल सुरू होती. कधी कारवीच्या जंगलातून, कधी मोकळ्या माळरानातून तर कधी दोन्हीबाजूला दरी आणि मधल्या डोंगरावरून जाणारी वाट होती. माझा चालायचा स्पीड बाकीच्यांपेक्षा कमी होता त्यामुळे आमच्यात दोन ग्रुप झाले होते. कुलदीप, शुभम, अतुल आणि आदर्श पुढे तर मला सोबत म्हणून प्रणव माझ्यासोबत मागे होता. डांबरी रस्ता सोडून आतापर्यंत दीड एक तास झाला असावा तेवढ्यात पुढे गेलेली मंडळी एका उघड्या देवळाजवळ आराम करताना दिसली. सगळ्यांना भुका लागल्या होत्या त्यामुळे इथेच दुपारचा जेवणाचा कार्यक्रम उरकू असा प्रस्ताव मांडण्यात आला पण आणखी थोडा वेळ चालू आणि पुढच्या अर्ध्या तासात जेवणाचा मोठा ब्रेक घेऊ असं ठरलं आणि पुढं चालायला सुरुवात केली. आतापर्यंत राजगड बराच मागे राहिला होता तर तोरण्याची बुधला माची जवळ आली होती. डोळे बारीक करून बघितल्यावर बुधल्याच्या खाली दिसणारी लोखंडी शिडी सुद्धा नजरेत येत होती. एका ठिकाणी वाटेला दोन फाटे फुटले आणि त्यासमोरच दिशादर्शक फलक होता. डावीकडची वाट तोरणा वगळून थेट रायगड ला जाणाऱ्यांसाठी होती जी पासली गावात जात होती तर उजवी वाट तोरण्याकडे जात होती. याच्याच बाजूला आणखी एक फलक होता ज्यावर लिहिले होते, "राजगड-तोरणा वाटेतील महादू कचरे यांचे एकमेव निवासस्थान". या बोर्ड च्या मागे काही अंतरावर एक घर दिसत होतं. सर्वानुमते या घराच्या अंगणात दुपारचा पोटोबा उरकू असं ठरवून त्या बाजूला वळलो आणि दोनच मिनिटांत अतिशय सुंदर अश्या अंगणात विसावलो.


राजगड ते तोरणा या वाटेवर लागणारे महादू कचरे यांचे घर

आम्हाला घराकडे येताना पाहताच घरातल्या आजीबाईंनी अंगणात दोन-तीन घोंगड्या अंथरून ठेवल्या होत्या आणि पोहोचताच सर्वांना पिण्यासाठी पाणी दिले. अजिबात वेळ नं दवडता बॅग मधून थेपले, टोमॅटो सॉस आणि चटणी बाहेर काढली. घरातल्या आजींकडून ताक विकत घेऊन समोर आलेल्या खुराकावर अक्षरशः सगळे तुटून पडले. तोरणा वगळून थेट पासली मार्गे रायगड गाठायचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आणि सर्वानुमते तो ताबडतोब धुडकवण्यात सुद्धा आला. ताकाचा परिणाम थोड्याच वेळात सगळ्यांच्या  डोळ्यात दिसायला लागला होता त्यामुळे आजींच्या परवानगीने अंगणात अर्धा तास आराम करून पुढे निघू असं ठरलं आणि सगळेच पुढच्या काही मिनिटांत गार झाले.

अर्धा तास आराम करायचा हे ठरवून सुद्धा चांगला तासभर आराम करण्यात आला. आमच्याकडे मुबलक पाणी होते तरी रिकाम्या बाटल्या रिफिल करण्यासाठी आजींकडे पाण्याची विचारणा झाली पण त्यांना सुद्धा पाणी खूप लांबून आणावं लागतं म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला. २:३० वाजता आजींना ताकाचा मोबदला देऊन आणि वाटेची माहिती घेऊन आम्ही सहा जणांनी तोरण्याकडे पावलं वळवली.

दुपारचं जेवण थोडं जास्तच झाल्याने पावलं जडावली होती त्यामुळे जमेल तसं मार्गक्रमण करत होतो. थोड्या वेळात आजूबाजूला असलेलं कारवीच जंगल संपलं आणि उन्हाचा जबरदस्त तडाखा बसायला सुरुवात झाली. सगळ्यांत कमजोर कडी मीच असल्याने अर्थात सगळ्यात शेवटी होतो तर सोबत प्रणव होता. तोरण्याच्या शेवटचा चढ तर अक्षरशः जीवावर आला होता. अगदी १०-१५ पावलावर थांबत होतो आणि त्यात उन्हामुळे चक्कर यायला लागली. लोखंडी शिडी पुढे १० मिनिटांवर होती. वाटेत कुठेही सावली नव्हती त्यामुळे तिथंच बसकण मारली आणि सोबत असलेल्या प्रणव ला सांगून टाकलं की भट्टीत उतरल्यावर मी घरी निघून जातो. त्याबरोबर इतका वेळ मला सहन करणारा प्रणव चांगलाच उखडला आणि तुला भट्टीतून परत जायचं असेल तर आत्ताच सांग मग मी इथून मागे राजगड ला जाऊन गुंजवणेतून मुंबईला परत जातो असं सांगून मोकळा झाला😂. या वाक्यावर हसायचं का रडायचं तेच कळत नव्हतं पण माझी अवस्था खरंच खूप वाईट झाली होती आणि अश्यात पुढचा रायगड पर्यंत चा टप्पा कसा गाठणार याचंच टेन्शन मला आलेलं.


तोरणा किल्ला


तोरण्याचा शेवटचा चढ



बाकीच्या साथीदारांनी एव्हाना शिडीला हात घातला होता. होतो त्या जागेवर मला बसवून प्रणव पुढे गेला आणि शुभम ला घेऊन पुन्हा मागे आला. शुभम ने स्वतःची बॅग वर पाठवून दिली होती त्यामुळे माझी बॅग घेऊन तो पुढे आणि त्यामगोमाग मी आणि माझ्यामागे प्रणव चालत होतो. अथक प्रयत्नांनी साधारण अर्ध्या तासाने छोटा कातळतप्पा आणि ती लोखंडी शिडी पार करून गडावर दाखल झालो.

बाकीची मंडळी निवांत गप्पा मारत बसलेली. आम्ही पोचलो तेव्हा छोटा लिंबूपाणी आणि पार्लेजी चा ब्रेक घेतला. आज ख्रिसमस चा दिवस होता हे इथं आल्यावर आमच्या लक्षात आलं त्यामुळे आमच्यातलया काही जणांची आपल्या "खास" माणसांना "मेरी ख्रिसमस"😂 शुभेच्छा द्यायला फोनाफोनी सुरू झाली. आजूबाजूला पूर्वज जमा झाल्यावर इथे थांबण्यात अर्थ नाही म्हणून पुढच्या वाटेला लागलो तेव्हा घडाळ्यात ४:३० वाजले होते. एकटा शुभम आधी तोरण्यावर येऊन गेला होता पण बुधलामाची वरून पुढे कसं जायचं हे कोणालाच कळत नव्हतं. आलेल्या लोकांना विचारत बुधला सुळक्याच्या खालून पुढे आलो तितक्यात समोरून एक आजीबाई येताना दिसल्या. त्यांना भट्टी गावात जाणारी वाट विचारली तेंव्हा सरळ जाऊन डावीकडे वळा आणि तिथून खाली उतरलात की २ तासांत भट्टीमध्ये पोचाल म्हणून सांगितलं. म्हणजे साधारण ६:३०-७:०० पर्यंत आम्ही भट्टीत असणार होतो.

आजींनी सांगितल्याप्रमाणे डावीकडची वाट घेतली आणि पुढे चालायला सुरुवात केली. ही वाट प्रचंड वाढलेल्या कारवीतून होती शिवाय घसारा सुद्धा खूप होता. भट्टी मध्ये उतरणारी वाट खूप घसरणीची आहे हे वाचून माहिती होतं, त्यामुळे पुढे चालत राहिलो. मध्ये डाव्या बाजूला पाण्याच्या टाक्यासारखं काहीतरी होतं पण ते पूर्ण चिखलाने भरलेलं होतं. साधारण अर्ध्या पाऊण तासांनी उजवीकडे खाली एक बुरुज दिसला पण तिथं जाणारी वाट मात्र दिसत नव्हती. आणखी थोडं पुढे गेलो तर ज्या वाटेने आलो ती वाट पूर्णपणे बंद झाली होती. आम्ही सपशेल वाट हरवलो होतो हे कळून चुकलं आणि मागे फिरलो थोड्यावेळा आधी जो बुरुज दिसला तिथं जायला काही वाट आहे का ते बघत होतो. मी नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड केला त्या महादेव सरांनी मला मॅप वर मार्किंग करून पाठवलं आहे हे आठवलं आणि लगेच मोबाईल काढून त्यावरून काही कळत का ते बघायला लागलो. मगाशी आजींना वाट विचारली त्यापुढे ३ वाट निघत होत्या. एक पूर्ण डावीकडे वळत होती, एक थोडी उजवीकडे आणि एक वाट या दोघांच्या मधून गेली होती. उजवीकडे जाणारी वाट मुख्य किल्ल्यावर जाणारी होती, मधली वाट वाळंजाई देवी दरवाज्यातून भट्टी मध्ये उतरत होती तर अगदी डावीकडची वाट कापूरलेणी कडे जात होती. आम्ही या कापूरलेणीच्या वाटेवर होतो. मगाशी दिसलेलं ते पाण्याचं टाकं नव्हतं तर ती कापूरलेणी होती हे स्पष्ट झालं. पुन्हा मागे फिरून बुधल्याच्या पायथ्याला आलो. पुन्हा मार्किंग बघितली तर दोन वाटांच्या मध्ये पुसटशी एक वाट दिसली. खात्री करायला म्हणून कुलदीप त्या वाटेने पुढे गेला आणि पाचंच मिनिटांत पुढे दरवाजा आहे हे सांगायला पुन्हा मागे आला.

वाट सापडली होती तिच्यावरून पुढे भल्यामोठ्या दरवाज्यात आलो. दरवाज्याच्या पुढे थोडा धोकादायक टप्पा होता जिथे पायाला ग्रीप नव्हती फक्त मध्ये एक झाडाचं मूळ होतं त्याचाच आधार होता. सेफ्टी साठी आमच्याकडे रोप होता पण त्याची गरज वाटत नव्हती. सावकाश सगळे तो टप्पा उतरून आलो आणि पुढच्या दोन-तीन मिनिटांत एका पाण्याच्या टाक्याजवळ आलो. इथून डावीकडे कारवीच्या जंगलातून एक वाट जाताना दिसत होती. या सगळ्या चुकचुकीच्या घोळात तब्बल अडीच तास निघून गेलेले आणि साधारण ७ वाजत आले होते. एकतर वाट कोणालाच माहिती नाही त्यात घसरडी वाट त्यामुळे आता उतरायचं की आता मुक्काम करून उद्या उतरायचं या दुविधेत होतो. तोरणा बद्दल दंतकथा ऐकल्या होत्या की गडावर भुताचा वावर आहे त्यामुळे काही झालं तरी तोरणा वर मुक्काम करणार नाही हेच जवळपास सगळ्यांच मत होतं. आता उतरून भट्टी मध्ये मुक्काम करून उद्या सकाळी मोहरी कडे जाऊ हे सर्वानुमते ठरलं आणि उतरायला सुरुवात करणार तेवढ्यात त्या वाटेने काहीसा आवाज आला म्हणून तिथंच थांबलो. बघितलं तर ३ माणसं खांद्यावर भलामोठा जनरेटर घेऊन त्या वाटेने वर आली होती. थोड्या चौकशीअंती कळलं की ही बा रायगड परिवाराची माणसं आहेत जी कापूरलेणी साफ करायला भट्टी गावातून चढून वर आलेली. चला म्हणजे वाट तर हीच होती. त्यांना वाटेबद्दल विचारलं असता रात्री इथून उतरू नका कारण इथे जंगली प्राणी तसंच सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याचं आणि एक-दोन ठिकाणी वाट चुकण्याची शक्यता असल्याचं कळलं. रात्री या वाटेने उतरायचा निर्णय तात्काळ रद्द करून आहोत तिथेच मुक्काम करू असे ठरलं पण आता आम्ही होतो ती जागा सुद्धा तितकी सुरक्षित नव्हती आणि बाजूला बरंच रान वाढलं असल्याने सरपटणाऱ्या जीवांची भीती होती. एव्हाना साडेसात वाजले होते आणि थोडीफार भूक पण लागलीच होती. त्यामुळे इथंच जेवण बनवून मग वर गडावर मुक्कामाला जायचं ठरवलं. जनरेटर घेऊन आलेले तिघे जण आम्हाला काळजी घ्यायला सांगून त्या भल्या मोठ्या जनरेटर सह गडावर निघून गेले.

आता जेवण बनवायचं होतं. रात्री जिथं मुक्कामाला थांबू तिथंच गावातल्या एखाद्या घरात जेवणाची सोय करायला सांगायची आणि त्याबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला द्यायचा असं ठरलेलं तर इतर वेळेसाठी मॅगी, रेडी तो ईट सूप चे पॅकेट्स आणि चहा साठी लागणारं सामान सोडून आम्ही काहिच आणलं नव्हतं. असलेल्या समानावर समाधान माणूस त्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच छोटेखानी चूल मांडली. टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य होतं त्यामुळे त्यातल्याच पाण्याने चहा बनवला. चहानंतर सूप ची पाकिटं फोडून आधी सूप बनवलं आणि नंतर त्याच चुलीवर मॅगी बनवली. रात्रीच्या जेवणासाठी मॅगी आणि सूप असा साग्रसंगीत(?) बेत झालेला. पोटपूजा करून आणि टाक्यातलं पाणी बाटल्यांमध्ये रिफिल करून आम्ही पुन्हा गडावर जायला निघालो. मगाशी उतरलो तो धोकादायक टप्पा चढून पुन्हा दरवाज्यात आलो आणि दोनच मिनिटांत पुन्हा बुधल्याच्या खाली. आमचं गडावरचया मेंगाई देवीच्या मंदिरात मुक्काम करायचा विचार होता. बुधला माची पासून मेंगाई मंदिरापर्यंत चे अंतर थोडं जास्त होतं आणि उद्या भट्टी मध्ये उतरायला आम्हाला पुन्हा इथेच यायचं होतं. हा असा डबल फेरा वाचण्यासाठी जिथे आहोत तिथंच मुक्काम करायचं ठरवलं. जागा बरीच मोकळी होती आणि आजूबाजूला रान पण जास्त वाढलं नव्हतं शिवाय सकाळी उतरायची वाट अगदी डोळ्यांसमोर आणि मुख्य म्हणजे कापूरलेणीची वाट सुद्धा बाजूलाच. त्यामुळे काही मदत लागलीच तर तिथं संवर्धन करायला आलेल्या तिघांना सहज बोलावता येणार होतं. तीन तंबू उभे केले गेले आणि आमच्यातले काहीजण लगेच बाटल्या घेऊन 'वाघ' आणि 'ससे' मारायला निघून गेले. तोरण्याच्या दिशेने एक शेकोटी पेटवलेली दिसली आणि एक-दोन बॅटऱ्या सुद्धा दिसत होत्या. म्हणजे तिथं सुद्धा कोणीतरी मुक्कामाला होतं. डिसेंबर ची थंडी मी म्हणत होती आणि वारा सुद्धा खूप होता त्यामुळे ती जात जास्तच वाटत होती त्यामुळे तंबू समोर शेकोटी पेटवली आणि त्याची ऊब घेत थोडा वेळ गप्पा मारत बसलो. इथेच उद्या बोराटा नाळ स्कीप करून सिंगापूर नाळेने उतरायचं नक्की केलं गेलं. तोरणा वरच्या भुतांच्या गोष्टींमुळे इथे मुक्काम करायची कोणाचीच इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता त्यामुळे "जो होगा देखा जायेगा" म्हणत ११ च्या सुमारास सगळेच तंबूत घुसून गुडूप झालो.

सकाळी ६:०० ला जाग आली तेव्हा थंडी होतीच शिवाय वारा सुद्धा होताच सोबतीला. पूर्वेकडून राजगडाच्या मागून सूर्योदय होत होता. थोडा वेळ आकाशातल्या रंगांची मजा घेतली आणि तेवढयात पुढची चाल आठवली. घाई करायला हवी होती कारण आजच्या दिवसात भट्टी मध्ये उतरून गेळगणी-मोहरी-सिंगापूर-सिंगापूर नाळ-दापोली-वारंगी असा भला मोठा टप्पा गाठायचा होता. प्राथमिक विधी उरकला आणि खाली भट्टी मध्ये नाश्ता करू असं ठरवून ७ वाजता उतरायला सुरुवात केली.

मधली वाट धरून चालायला लागलो आणि तो धोकादायक टप्पा उतरून पुन्हा पाण्याच्या टाक्याजवळ आलो. रिकामी झालेल्या बाटल्या पुन्हा रिफिल केल्या आणि डावीकडच्या वाटेने उतरायला सुरुवात केली. तोरणा वरून भट्टी गावात उतरणारी ही वाट खूप जास्त उताराची आणि घसरडीची होती. आजूबाजूला असणारी कारवी हाच काय तो आधार. इतकं असलं तरी वाट धोकादायक नव्हती हीच काय ती जमेची बाजू. या वाटेने उतरताना तोरण्याची तटबंदी पूर्ण वाटेत दिसत राहते. वाटेत येणाऱ्या कारवीचा आधार घेत उतरत होतो. जिथं आधाराला कारवी नव्हती तिथं बसकण मारून सर्रकन खाली येत होतो. आम्ही जात होतो तोच आमच्या मागून कालची जनरेटर वाली मंडळी आली आणि थोडंफार बोलणं करून त्या जनरेटर सकट पुढे निघून सुद्धा गेली. तोरणा पासून ते भट्टी पर्यंत जाणाऱ्या या वाटेपैकी ८०% वाट ही घसरडीची आहे. जिथून आम्हाला उतरतांना इतकी कसरत करावी लागत होती तिथून हे तिघे जण तो भला मोठा जनरेटर घेऊन कसं काय चढले असतील हाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना सारखा पडत होता.
थोड्या अंतरावर पुन्हा जनरेटर वाली मंडळी आरामासाठी बसली होती. त्यांच्याकडून योग्य वाट समजावून घेतली आणि पुढे निघालो.

तोरणा किल्ल्यावरून भट्टी गावात उतरताना काढलेला फोटो, मागे तोरणा किल्ला आणि बुधला

तोरणा वरून निघाल्या नंतर बरोब्बर २ तासांनी म्हणजे ९ वाजता भट्टी गावातल्या दत्त मंदिराजवळ पोहोचलो. या मंदिरापासून कच्चा रस्ता सुरू झाला होता जो बाहेर घेऊन जात होता. या रस्त्यावरून चालतांना मंदिराच्या पुढे डाव्या बाजूच्या शेतात हापसा दिसला. काहीही न बोलता सगळे तिथं वळले आणि थोडक्यात अंघोळी उरकल्या. अंघोळी नंतर बॅग मधली फळं आणि बिस्कीट खाऊन पुढची वाट धरली.

बाहेर मुख्य रस्त्याला आलो तेव्हा कळलं की मोहरी ला जायला २ पर्याय आहेत. एक या डांबरी रस्त्याने १० किलोमीटर चालत किंवा मिळेल त्या वाहनाने आधी केळद फाटा आणि मग तिथून ७ किलोमीटर वर असलेल्या सिंगापूर ला जायचं आणि दुसरा पर्याय म्हणजे समोरच्या शेतातून जाणारी डोंगराची वाट धरून गेळगणी, हरपूड मार्गे मोहरी आणि मग तिथून सिंगापूर. थोडा वेळ तिथं सिंगापूर किंवा केळद फाट्याला जायला गाडी मिळते का त्याची चौकशी सुरू केली कारण गाडीने गेलो असतो तर बराच वेळ वाचला असता. अर्धा तास वाट बघितली पण व्यर्थ.  गाडीची वाट बघून सगळेच कंटाळले होते आणि डांबरी रस्त्याने चालत जाण्यापेक्षा डोंगराची वाट कधीही चांगली त्यामुळे समोर दिसणाऱ्या डोंगराच्या वाटेने पुढचा मार्ग धरायचं ठरलं. तोरणा वरून भट्टी मध्ये उतरताना सुद्धा मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं म्हणून "मी इथून मुंबईला परत जातो असं सांगून टाकलं". "मुंबईला नको जाऊ, इथून गाड्या वगैरे बघ आणि लिफ्ट घेत घेत सिंगापूर ला पोहोच तिथं आम्ही भेटतो तुला" - इति प्रणव. पडत्या फळाची आज्ञा मानून माझ्या बॅग सकट मी एकटा पुन्हा रस्त्यावर आलो आणि बाकी समोर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने निघून गेले तेव्हा साधारण १०:३० झाले होते. तिथेच बाजूला एक शाळा होती जिथे काल राजगडावर दिसलेला २०० जणांचा ग्रुप मुक्कामाला होता. शाळेच्या आसपास दिसणाऱ्या गावकऱ्यांकडे एस.टी. बद्दल चौकशी केली तेव्हा कोरोना महामारीमुळे एस.टी. बंद आहे असं कळलं. एक-दोन बाईक वाले दिसले पण त्यांच्या मागे बसायला जागा नव्हती म्हणून आणखी थोडा वेळ वाट बघू नाहीतर डांबरी रस्त्याने पुढे चालायला सुरुवात करायची आणि गाड्या दिसतील तसं लिफ्ट घेत पुढे जायचं असं ठरवलं.

पाचंच मिनिटांत एक रिकामं जीपडं समोर येऊन उभं राहिलं त्यातल्या फक्त ड्रायवर च्या बाजूच्या सीट वर एक जण बसले होते आणि बाकी पूर्ण गाडी रिकामी होती. मनात विचार येऊन गेला आपली माणसं आणखी ५-१० मिनिटं इथं थांबली असती तर सगळे एकत्र गेलो असतो. असो, जीप वाले काका पासली फाट्यापर्यंत जाणार होते. काकांसोबत गप्पा मारत पासली फाट्याला पोहोचलो. काकांचा निरोप घेतला आणि बाजूला दिसणाऱ्या छोट्या हॉटेल कडे मोर्चा वळवला कारण ११ वाजायला आलेले आणि भूक पण लागलेली. हॉटेल मध्ये पद्धतशीर ऊबपीठ आणि चहा घेतला आणि बाहेर आलो.

हॉटेलच्या पुढे डावीकडून एक रस्ता येऊन मुख्य रस्त्याला मिळत होता तिथून मोठ्याल्या बॅग्स घेऊन येणारे काही जण दिसले. चौकशी केली तेव्हा कळलं ते लोकं राजगड ते रायगड करत होते पण तोरणा स्कीप करून. म्हणजे ही तीच वाट जी आम्ही काल दुपारी पहिली होती कचरे मामांच्या घराजवळ. मी पासली फाट्याला येऊन उभा राहिलो तर बाकीची त्या वाटेने आलेली मंडळी चालत पुढच्या रस्त्याला लागली. जवळपास अर्धा तास वाट पाहिली पण एकही गाडी तिथून गेली नाही. शेवटी कंटाळून चालायला सुरुवात केली. रस्त्याला चांगलाच चढ होता साधारण ४-५ किलोमीटर चालायला मला चांगला तासभर लागला होता. थकून एका झाडाखाली बसलो पाणी प्यालो आणि तितक्यात मागून एक मारुती ८०० येताना दिसली. गाडीवाल्या काकांना केळद ला जायचं होतं म्हणून त्यांनी केळद फाट्याला सोडायची तयारी दाखवली. पुढचे २ किलोमीटर चे अंतर गाडीने अवघ्या ३-४ मिनिटांत पार झाले. गाडीवल्या काकांचा निरोप घेताना वाटेबद्दल विचारलं तेव्हा कळलं की इथून उलट्या बाजूने वर जाणाऱ्या वाटेने आधी एकलगाव आणि मग सिंगापूर गाठता येईल.

उलट बाजूने वर जाणाऱ्या वाटेने चालायला सुरुवात केली. एव्हाना १२ वाजले होते त्यामुळे उन्हाने हैराण झालो होतो आणि शिवाय अख्या वाटेत माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. थोडं पाणी पीत आणि लिमलेट च्या गोळ्या खात पुढे जात होतो. पुढचा अर्धा तास २-३ किलोमीटर डांबरी रस्त्याने चढून गेल्या नंतर तो चढ संपला तितक्यात अगदी थोड्याच अंतरावरून २५-३० पांढऱ्या रंगाची आणि काळ्या तोंडाची मोठी माकडं रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे जाताना दिसली. माझ्याकडे भली मोठी बॅग आणि त्यात आमच्या सगळ्यांच्या खायचं जिन्नस होतं त्यामुळे बाजूला असलेल्या एका झाडाखाली त्यांच्या नजरेत येणार नाही अश्या रीतीने शांत बसून राहिलो. सगळ्या पूर्वजांचा रस्ता क्रॉस करून झाला आणि आणखी ५ मिनिटं तिथंच बसून मी पुढे चालायला सुरुवात केली. एखादा किलोमीटर चालून गेलो तोच मागून एक जीप येताना दिसली जी सिंगापूर ला जात होती. याच जीप मध्ये माझा एक मित्र महेश आणि त्याच्या सोबत त्याचा एक मित्र असे दोघे जण भेटले जे राजगड-तोरणा-रायगड करत होते. जीप मध्ये गप्पा सुरु असतांना कळलं की काल रात्री तोरण्यावर जी शेकोटी आणि बॅटऱ्या दिसलेल्या त्या यांच्याच होत्या. पुढच्या १५-२० मिनिटांत एकलगाव मागे टाकले. एकलगाव मागे टाकल्यावर डाव्या बाजूला लिंगाणा आणि आमचे अंतिम लक्ष्य असणाऱ्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाने दर्शन दिले.मोहरी फाट्याजवळ पोहोचलो तेव्हा महेश आणि त्याच्या मित्राला निरोप दिला कारण ते दोघे इथे उतरून मोहरीत जाऊन बोराट्याच्या नाळेने उतरणार होते तर आम्ही सिंगापूर नाळेने कोकणात उतरणार होतो. पुढच्या ५ मिनिटांत जीप ने सिंगापूर गावात पोहोचलो. ड्रायवर काकांना वाट विचारली तर उजवीकडे दिसणाऱ्या घराच्या बाजूने जायला सांगितलं. घराजवळ आलो आणि तिथल्या बाबांना आमच्या बाकीच्या माणसंच वर्णन विचारलं तर असं कोणीही इथून गेलेलं नसल्याचं कळलं. तरी थोडं पुढे जाऊन वाट बघून येऊ म्हणून घराच्या बाजूच्या वाटेने खाली उतरून पुढे आलो. जवळच एका ओढ्याजवळ त्या २०० जणांच्या ग्रुप मधली शेवटची काही माणसं दिसली आणि त्यांच्याकडून नीट वाट समजावून घेतली.

इथेच सहज म्हणून मोबाईल काढला तर त्याला रेंज होती. लगेच बाकीच्या मंडळींना फोन लावला. नशिबाने कुलदीप चा नंबर लागला. त्याला विचारलं तर कळलं त्यांना पोचायला २-३ तास सहज जातील. सगळं खायचं सामान माझ्याकडे असल्याने यांनी सिंगापूर गावात कुठेतरी दुपारच्या जेवणाची सोय करायला सांगितली. पुन्हा वर आलो आणि मगाशी जे घर दिसलं तिथं जेवणाची सोय करण्याची विनंती केली. घरातल्या मामांनी आनंदाने विनंती स्वीकारली आणि आपुलकीने चौकशी केली. यांचं नाव पोटे मामा (पहिलं नाव आठवत नाही). घरासमोर मोठी विहीर होती तिथे जाऊन फ्रेश झालो आणि एक छोटीशी झोप काढली. नंतर बाकीचे येईपर्यंत मामांसोबत गप्पा मारत बसलो. साधारण ४:३० च्या दरम्यान बाकीची मंडळी सुद्धा येऊन पोहोचली. आल्या आल्या घरात आधी सगळ्यांचे मोबाईल चार्जिंग ला लावले गेले. खायचं सगळं सामान माझ्या बॅग मध्ये असल्याने बाकीचे पाचही जण प्रचंड भुकेले होते. लगेच विहिरीवर जाऊन सगळे फ्रेश झाले आणि बनवलेल्या पिठलं भाकरी आणि भातावर यथेच्छ ताव मारला. 

 हा ब्लॉग पूर्ण लिहून झाला पण मला त्यात बाकीच्या पाच जणांच प्रवास वर्णन सुद्धा हवं होतं त्यामुळे ते लिहून देण्याची शुभम ला गळ घातली शुभम कडून ते लिहून घेतलं सुद्धा. शुभम ने दिलेला इतिवृत्तांत त्याच्याच शब्दात पुढे लिहितोय.
"एकंदरीत निनाद दादाचा हा प्रवास भट्टीपर्यंत येऊन संपल्यात जमा होता पण हा सुरू झालेला प्रवास इथवर येऊन संपू द्यायचा नव्हताच. म्हणून निनाद दादा ला इथून गाडी पकडून थेट सिंगापूर ला भेटा असं सांगून मी, प्रणव, आदर्श, अतुल आणि कुलदीप आम्ही समोर दिसणाऱ्या टेकडीची वाट धरली. चढण फार अवघड नाही पण दमछाक करणारी नक्कीच होती. पाठीवरील बॅगचं ओझं आणि वाढणारं ऊन आता जाणवायला लागलं होतं. टेकडी पार केली आणि समोर असणाऱ्या मोकळ्या माळरानावर एक घर आणि त्याला लागून एक छोटं शेत होतं. इथेच आमच्या सगळ्यांच नाश्ता करून घ्यायचं ठरलं पण तेवढ्यात एक गोष्ट लक्षात आली की ट्रेक साठी आणलेले ठेपले आणि बाकी खाण्याचं जिन्नस निनाद दादांच्या बॅग मध्ये राहिलंय आणि आपल्याकडे खाण्यासाठी खूप कमी पदार्थ आहेत. प्रणव दादांकडे असलेली संत्री, एक खजुराचं पाकीट, लिंबू आणि काही ORS ची पाकिटं यावर सिंगापूर ची वाट कमी करावी लागणार होती. सोबत असलेले लिंबू आणि ORS ची पाकीट फोडून त्याचं सरबत बनवून पोटात ढकललं. थोड्या वेळाने समोरच्या घरातले श्वान (कुत्रे) पळत पळत जवळ आले, मग थोडावेळ तिथं वेळ घालवून फोटोग्राफी केली तितक्यात समोरच्या घरातल्या आजोबांनी आवाज दिला, "पोरांनो, कुठं चाललाय?" "सिंगापूर ला जातोय बाबा आणि मग तिथून रायगडावर जाणार", इति आम्ही. बाबांनी कोण्याकाळी या मार्गावर प्रवास केला असेल या आशेवर आम्ही पुढील मार्गाची चौकशी केली तर बाबांनी सांगितलं की इथून पुढं गेल्यावर गेळगणी फाटा लागेल तिथून गेळगणी आणि पुढं हरपूड गाव लागेल. हरपूड गावातले गावकरी पुढची म्हणजे सिंगापूर ची वाट सांगतील. तेव्हा बाबांनी सांगितलेला route आपल्या ट्रेक route सोबत अगदीच जुळतोय हे लक्षात आलं. जराही वेळ वाया नं घालवता आम्ही बाबांचा निरोप घेऊन पुढची वाट धरली. आम्ही निघालो तसं ते कुत्र्याचं पिल्लू मागे येऊ लागलं तेव्हा त्याच घरातल्या आजींनी त्याला मागे पाठवून द्या म्हणून सांगितलं. त्यांना परत पाठवलं तस आजी म्हणाल्या की पोरांनो थोडं पुढे गेले असता, एक चढणं लागेल ती पार करून डांबरी रस्ता लागेल तो रस्ता थेट गेळगणी कडे जातो, ही सर्व माहिती मिळताच आजींना धन्यवाद देऊन आम्ही गेळगणी कडे निघालो. पुढे मळकी वाट दिसत असल्याने आपण योग्य त्या रस्त्यावर आहोत हे समजतं होतं.






थोडे पुढे आलो असता डांबरी रस्ता लागला. रस्ता मात्र निर्मनुष्य होता. इथूनच चढणीला ला सुरवात झाली.कोणतीही वेळ वाया न घालवता सर्वजण चालत होंते. एव्हाना ऊन जाणवायाला लागलेलं. पुढे रस्ताच्या बाजूला एक झाड दिसलं. सावली दिसताच सगळे तिथेच थांबले. सोबत बनवून आणलेला tang सर्वांनी घेतला आणि निनाद दादां सोबत काही सपंर्क होतोय का म्हणून मोबाईल बघितला तर इथे कोणतंही नेटवर्क साथ देत नव्हतं. पुढचा प्रवासाला सुरवात केली असता गेळगणी गावाचा थोड्या अंतराआधी गेळगणी फाट्याचा इथे एक दादा बसलेले दिसले. येथून 1.5 किमी चालून गेलात किं तुम्हाला गेळगणी गाव लागेल असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही पुढे निघालो. अखेर दुरून गेळगणी गावाचं दर्शन झालं अगदी मनाला दिलासा मिळाला. यां सह्याद्रीचा डोंगर रांगेच्या कुशीत वसलेलं हेच ते गेळगणी गाव. या गावातून जात असताना बऱ्याच गोष्टी विचारात पाडणाऱ्या होत्या. शहरापासून दूर असलेलं हे गाव पण इथे प्राथमिक सोयी-सुविधा, रुग्णालय, चांगलं शिक्षण देणाऱ्या शाळा असतील की नाही याची शाश्वती नव्हती. शिक्षणापासून वंचीत असलेली गावातील मुलं, दूरवर पायपीट करून उन्हाचे चटके खात अनवाणी चालणाऱ्या पोरांची पण काही स्वप्न असतीलंच ना? एकंदरीत केव्हा तरी आपल्यासारख्या भटक्यांना बघून त्यानां सुद्धा शहरी आकर्षणं होत होतंच असेल ना? शहरं नक्की असतात तरी कशी हे सुद्धा ठाऊक असेल का यांना? आणलेली चॉकलेट्स त्यांचा हाती दिली असता त्या मुलांचा चेहऱ्यावरील समाधान आणि आनंदआजतागत सुखमय वाटते. पोरांनो हरपुड कडे जाणारा हाच का तो रस्ता? असे विचारता काहींचा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलें. एकंदरीत हा प्रवास अतिशय कमी लोकं करतात किंव्हा यां घाटवाटा चा उपयोग फार कमी प्रमाणात केला जातो ह्याचा प्रत्यय इथे दिसून आला. थोड्याच वेळात गेळगणी गावात पोहोचलो तेव्हा गावातल्या लोकांकडे चौकशी केल्यावर हीच ती वाट हरपुड कडे जाते असे  सांगितले आणि आमचे पाय त्या वाटेचा दिशेने सरकले.

गेळगणी ते हरपुड पर्यंत चा मोठा पल्ला आम्हाला पार करायचा होता. आमच्या आधी गेलेल्या त्या चे ट्रेक ग्रुप चे २०० मेंबर आधीच पुढे गेले असल्यामुळे वाट मळकी झालेली दिसत होती. यामुळे थोड्क्यात कुठेही वाट नं चुकण्याचा अंदाज आम्ही काढला आणि हरपुड चा दिशेने निघालो. सिंगापूर गावाला संद्याकाळ व्हायच्या आधी पोहचणे असल्याने सर्वांचे पाय झपाट्याने पडत होते. वाट फार अवघड नव्हती, अगदी डोंगरालगत चालत एक एक जण पुढे सरकत होता. गेळगणी ते हरपुड दरम्यान कुठेही पाणवठा लागत नाही. पाण्याची कोणतीही सोय नसल्याकारणाने सर्वांनी आपल्या सोबत मुबलक पाणी घेणे गरजेचे आहे. संपूर्ण दुपारची ही चाल आता थकवायला लागली होती त्यामुळे इथेच सोबत असलेली संत्री आणि खजूराच पाकीट फस्त करून थोडा आराम करून निघालो. हरपुड गावाचा आधी रानात एक घर दिसलं. तिथे जाऊन पुढील वाटेची चौकशी करूया या विचारात आम्ही गेलो असता त्या दादांनी पुढील वाटेची माहिती दिली. दादांनी जेवणाची चौकशी केली असता आम्ही जेवण सिंगापूर ला करणार असे सांगितले. दादांकडे ताक होतं, मग सर्वांनी ताक घेतलं आणि तिथेच थोडावेळ आडवे झाले. थोड्या अंतरा वर हरपुड होतं मग प्रणव दादांनी सर्वाना उठवलं कारण फार वेळ दवडून चालणार नव्हतं आणि बरंच अंतर गाठायचं होतं. बॅग उचलून सगळे वाटेकडे निघाले. अगदी थोड्या अंतरा वर हरपुड गाव लागलं. बस आता दिवसाचा तिसरा टप्पा गाठायचा होता ते म्हणजे सिंगापूर गाव. डोंगर रांगेची ही चढ उतार पार करत असता ह्या डोंगर रांगेतून एक टोक वर आलेलं दिसलं. तो म्हणजे कडसारी लिंगाणा. लिंगाणा चा दर्शन होताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होत. दिवस भराची ही पायपिट, थकवा काही क्षणात दूर झाला. एवढ्यात मोबाईल नेटवर्क आलेले दिसलें आणि निनाद दादांन शी कॉन्टॅक्ट झाला. दादाराव आमचा आधीच सिंगापूर मध्ये पोहचले होते. ही बातमी ऐकताच सर्वे जण खुश झाले. दादांना सिंगापूर गावात जेवणाची सोय करायला सांगितली आणि आम्ही पुढची वाट धरली. वाटेवरून खाली उतरताच एक गाव दिसलें. गेल्या वर्षी लिंगाणा climbing ला आलेलो तेच हे गाव म्हणजे मोहरी असे लक्षात आलं. इथून एक डांबरी रस्ता थेट सिंगापूर कडे जातो. आम्ही सर्व जण त्या रस्तानी पुढे गेल्यावर सिंगापूर गाव दिसलें. समोर च निनाद दादांचं दर्शन सुद्धा झालं. इथूनच एका नाळी सारखा रस्ता गावात उतरताना दिसला. मग काय आपण इथूनच खाली जातोय असे सांगत मी पुढे आलो. ते दगड धोंडे पार करत आम्ही एक एक खाली उतरलो. त्यामुळे सोबत असलेल्या कूलदीप दादांनी त्या वाटेला "दैवत नाळ" म्हणून घोषित घोषित करून टाकलं."

--शुभम इंगळे, रोहा.

ट्रेक सुरु केला तेव्हाच काही कारणांमुळे शुभम चं "दैवत" म्हणून नामकरण केलं होतं. ज्या वाटेला कुलदीप ने "दैवत नाळ" असं नाव दिलेलं ती वाट पूर्णतः छोट्या छोट्या दगडांची होती आणि पाय ठेवला कि ती दगडं हमखास घसरायची. तिथून उतरताना या सगळ्यांची गंमत मी मामांच्या अंगणातून बघत होतोच. सगळ्यांचं जेवण उरकेपर्यंत ५:१५ झाले. मामांना वाटेबद्दल विचारलं तर दीड एक तासात दापोलीत पोहोचाल असं उत्तर मिळालं. म्हणजे पोहचेपर्यंत आम्हाला खूप जास्त उशीर होणार नव्हता आणि ७:३० पर्यंत खाली कोकणात उतरू असा अंदाज बांधला पण फक्त या प्रवासातलीच नव्हे तर आमच्यापैकी सहाही जणांच्या आयुष्यातली सर्वात थरारक वेळ आता सुरू होणार होती याची आम्हाला कोणालाच साधी कल्पना सुद्धा नव्हती.

जेवणाचा योग्य तो मोबदला देऊन मामांचा निरोप घेतला आणि कोकणाची वाट धरली. यापुढे मी आधी वाट बघून आलो असल्याने पुढे होतो. आधी पक्क्या बांधलेल्या पाऊलवाटेने खाली आलो आणि छोटा ओढा ओलांडून पुढल्या वाटेला लागलो. वाट पक्की मळलेली होती पण अधून मधून बऱ्याच ढोरवाटा येऊन मिळत होत्या पण रस्त्यावर असलेल्या झाडांवर आणि दगडांवर ऑईल पेंट ने मार्किंग केलेले होते त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता खुपच कमी होती. मामांनी सांगितलं होतं साधारण अर्ध्या तासाने मोठा ओढा लागेल तो ओलांडून गेलात की डावीकडे नाळेला सुरुवात होईल. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, सव्वा तास झाला पण मामांनी सांगितलेला ओढा काही येत नव्हता पण वाटेवर असलेल्या मार्किंगमुळे वाट बरोबर आहे याची खात्री होती. शेवटी दीड तासानंतर मामांनी सांगितलेला ओढा लागला. गावकऱ्यांना डोंगरवाटेने जाताना लागणारा वेळ आणि आपल्या सारख्या माणसांना लागणारा वेळ यात किती फरक असू शकतो याचा पुन्हा अनुभव आला. ओढ्याच्या पुढेच छोटा कातळटप्पा उतरून नाळेची सुरुवात होत होती. एव्हाना सात वाजायला आल्याने काळोख पडत होता आणि काळोखातून आम्हाला सिंगापूर नाळेचा जंगलाचा टप्पा उतरावा लागणार होता किंवा पुन्हा वर सिंगापूर ला जावं लागणार होतं. इथपर्यंत उतरायला आम्हाला दीड तास लागलेला त्यामुळे इथून पुन्हा वर चढून जायचं म्हणजे कमीत कमी दोन-अडीच तास तरी सहज गेले असते शिवाय त्यामुळे पुढचं संपूर्ण नियोजन बिघडणार होतं. आम्ही जिथं होतो म्हणजे त्या ओढ्यात तिथंही मुक्काम करणं धोक्याचं होतं कारण आजूबाजूला जंगली श्वापदांचा वावर असलेलं घनदाट जंगल असल्याने रात्रीच्या वेळी ती श्वापदं इथे पाणी प्यायला येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. थोडावेळ तिथंच थांबून चर्चा केली आणि आताच सिंगापूर नाळ उतरायचं ठरलं. आम्ही जंगली श्वापदांपासून बचावासाठी फटाके आणले होते ते काढून खिशात ठेवले आणि आणि हेडटॉर्च डोक्याला लावून पुढची वाट धरली.

सर्वात पुढे शुभम, त्यामागोमाग प्रणव, आदर्श, मी, अतुल आणि सगळ्यात मागे कुलदीप होता. शुभम च्या हातात छोटा लायटर होता त्याचा टिकटिक आवाज करत तो पुढे सरकत होता. छोटा कातळटप्पा उतरलो तर पुढे डाव्या बाजूला जंगलयुक्त दरी आणि उजव्या बाजूला कातळ अशी वाट होती. दोन-चार पावलं पुढं गेलो तितक्यात सगळ्यात पुढे असणाऱ्या शुभम चा पाय घसरला आणि त्याने जागीच बसकन मारली. पायाला जखम झाली होती पण इथं बसून ती बघण्याची ही वेळ नव्हती याची जाणीव असल्याने त्याने स्वतःहून पुढची वाट धरली. शुभम च्या हातातलं टिकटिक करणारं लायटर याव्यतिरिक्त कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. ही शांतता अक्षरशः जीवघेणी होती त्यामुळे मागे असलेल्या कुलदीप आणि अतुल ने जोरजोरात गाणी म्हणायला सुरुवात केली आणि सगळे त्यांना साथ देऊ लागले. याचा फायदा असा होणार होता की आमचा आवाज ऐकून आजूबाजूची श्वापदं लांब निघून गेली असती (आम्ही स्वतःची घातलेली एक समज) आणि त्या गाण्यांमुळे आजूबाजूला असणारी शांतता जाणवणार नव्हती आणि मनातली भीती आपसूकच कमी झाली असती.

पुढच्या चारंच दिवसांवर पौर्णिमा येऊन ठेपली होती, चंद्राचा उजेड बऱ्यापैकी पडलेला असला तरी त्या घनदाट जंगलात तो उजेड म्हणावा तितका आपला प्रभाव पाडू शकला नव्हता त्यामुळे तिथं आम्हा सहा भटक्यांच्या डोक्याला लावलेल्या हेडटॉर्च शिवाय कसलाच उजेड नव्हता.  किर किर करणारे रातकिडे आणि गाणी म्हणणारे आम्ही यांच्यात स्पर्धा लागल्याचं वातावरण होतं. दोन सेकंद जरी गाणी थांबली तरी एरवी सौम्य आणि हवाहवासा वाटणारा तो रातकिड्यांचा तो आवाज अंगावर अक्षरशः काटे आणत होता. डिसेंबर चा महिना असल्याने थंडी जाणवत होती शिवाय वाऱ्याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ आणि पायाखाली मोडणारे काट्याकुट्यांचे आवाज सुध्दा धाबे दणाणून सोडायला पुरेसे होते. मधेच कधीतरी कुठूनतरी सळसळ ऐकू यायची तर कधी कुठूनतरी डोळे चमकल्याचा भास (?) व्हायचा पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून समोर दिसणाऱ्या दिशादर्शक बाणांच्या मदतीने आमची वाटचाल सुरू होती.

जमेल तितकं कमी थांबत दापोली गाव गाठायचं हे ठरलं होतं. तरी वाटेल तिथं पाणी पीत आम्ही गावची वाट कमी करत होतो. मधेच एका ठिकाणी उतरतांना आधाराला समोरच्या झाडाला हात लावला आणि त्याचा काटा सर्रकन बोटात घुसला. पाहिलं तर जखम मोठी नव्हती पण रक्त येत होतं. खिशातल्या रुमालाने ती जखम बांधून ठेवली आणि फक्त तो काटा बिनविषारी असुदेत हीच देवाकडे प्रार्थना करत पुढे चालायला सुरुवात केली. आम्ही चालत असतांना मागे कोणीतरी आवाज दिल्या सारखा वाटला म्हणून मागे वळून पाहिलं तर काही बॅटऱ्या दिसत होत्या. एक दिलासा मिळाला की या भयाण जंगलातून उतरणारे आपण एकटे नक्कीच नाही आहोत. मागून जे कोणी येत होतं त्यांची वाट बघण्यात अर्थ नव्हता कारण जंगलात असं आडवाटेवर थांबणं सुरक्षीत नव्हतं त्यामुळे जमेल तितक्या वेगात पुढची वाट उतरायला सुरुवात केली.

साधारण ८:३० च्या सुमारास आजूबाजूला वाहणाऱ्या पाण्याचा आवाज यायला सुरुवात झाली होती शिवाय लांबवर कुठेतरी लाऊडस्पीकर चा आवाज सुद्धा येत होता त्यामुळे गाव जवळ आल्याची खात्री पटत चालली होती. पाच एक मिनिटात जंगलातून बाहेर येऊन एका नदीत उतरलो पण पुढची वाट काही सापडेना. वेगवेगळे तर्कवितर्क लावून झाले पण वाट दिसत नव्हती. जवळपास पाच-दहा मिनिटे घालवल्या वर एक बाण दिसला आणि त्या दिशेने चालायला सुरुवात केली. दहा मिनिटांत गावात एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तिथे येऊन पोहोचलो. महाराजांचं दर्शन घेतलं आणि आणि सुखरूप गावात आणल्याबद्दल महाराजांचे आणि देवाचे मनोमन आभार मानले. संध्याकाळी साडे पाच वाजता सिंगापूर गावातून सुरू केलेला थरारक प्रवास रात्री नऊ वाजता म्हणजे तब्बल साडेतीन तासांनी दापोली गावात येऊन संपला होता.

महाराजांच्या पुतळ्या शेजारीच कसलीशी पाटी लावली होती त्यावर गावाचं नाव लिहिलं होतं, "दापोली". आम्ही आम्हाला हव्या असलेल्याच गावात पोहोचलोय हे कळल्यावर झालेला आनंद काही वेगळाच होता. लगेचच गावात असलेल्या एकमेव दुकानासमोर आलो आणि पाठीवरच्या भल्यामोठ्या बॅग एका कोपऱ्यात उतरवल्या गेल्या आणि मागोमाग कोल्ड्रिंक्स च्या ओर्डरी झाडल्या गेल्या. लगेच शुभम च्या पायाची आणि माझ्या हाताची जखम बघितली गेली. माझ्या जखमेतून रक्त येणं थांबलं होतं पण शुभम ला बऱ्यापैकी लागलं होतं आणि जखम थोडी चिघळली होती. लगेच बॅग मधल्या फर्स्ट एड किट ने जखम साफ करून बांधून ठेवली. कोल्ड्रिंक आणि थोडी बिस्कीट खाल्ली आणि दुकानवल्या मामांना वारंगीत जायला गाडीची काही सोय होईल का त्याबद्दल विचारलं. मामांकडून कळलं की गावात एकंच दुधाचा टेम्पो आहे तो टेम्पोवाला वारंगी मध्ये सोडेल. लगेच बॅग पाठीवर मारून त्याच्या घराची वाट धरली तर तो दादा टेम्पो घराबाहेर बाहेर लावून कुठेतरी बाहेर गेला होता. वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता शिवाय त्याच्या घरात सुद्धा कोणी नव्हतं. घरासमोर पुन्हा बॅग उतरवल्या गेल्या. तासभर झाला तरी टेम्पो वाल्याचा पत्ता नव्हता. आम्हाला काहीही करून आज मुक्कामाला वारंगीत पोहोचायचं होतं जेणेकरून उद्याचा वेळ वाचवता आला असता. अंधारातून चालत जायची कोणाचीच इच्छा नव्हती, त्यामुळे बॅगांसकट पुन्हा त्या दुकानात आलो आणि राहण्याची सोय कुठे होईल का ते विचारलं. राहण्यासाठी समोर दिसणारं दत्त मंदिर किंवा गावात सुरुवात करतांना लागणारी ग्रामपंचायतीची शाळा हे दोन पर्याय मिळाले, त्यापैकी दत्त मंदिरात गावाची सभा भरलेली असल्याने आम्ही आमचा मोर्चा शाळेकडे वळवला.

मागच्या गेट मधून शाळेच्या आवारात प्रवेश केला. पुढच्या बाजूला प्रशस्त जागा होती आणि त्यापुढे शाळेचा पुढच्या बाजूचा गेट. तीन तीन जणांच्या दोन टीम बनवल्या गेल्या. एक टीम टेंट लावणार होती आणि दुसरी चुलीसाठी लाकडं जमा करणार होती. मग दोन्ही टीम एकत्र येऊन जेवण बनवणार होत्या. लाकडं जमा करता करता शाळेच्या डाव्या बाजूला एक सुळका आकाशात घुसलेला दिसत होता. अनेक तर्कवितर्क लावून सुद्धा तो कोणता सुळका असावा यावर एकमत कोणाचंच होत नव्हतं. शिवाय दापोली मध्ये आल्या पासून मी जंगलात आम्हाला आवाज देणाऱ्या लोकांची वाट बघत होतो ते सुद्धा दिसले नव्हते. टेंट लावले  गेले, अथक प्रयत्नांनी चूल पेटली आणि जेवणासाठी सूप आणि मॅगी बनवायची तयारी सुरू झाली. ११ वाजता गप्पा मारत आणि आजचा थरारक प्रवास आठवत मनसोक्त मॅगी आणि सूप पोटात ढकललं आणि सगळी आवराआवर केली. टेंट मध्ये जाऊन डिलिट झालो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते.

सकाळी साडे सहा ला उठलो. डावीकडचा सुळका सकाळच्या संधीप्रकाशात आणखीनच उठून दिसत होता. त्यावर आणखी चर्चासत्र झडली पण खात्रीलायक कोणालाच काही सांगता येईना. शाळेच्या समोरून एक आजोबा जातांना दिसले तेव्हा त्यांना त्याबद्दल विचारलं तर म्हणाले तो "लिंगाणा" आहे, असं उत्तर मिळालं. आजवर लिंगाण्याचे बरेच फोटो आणि विडिओ पाहिले होते पण या दापोली गावातून दिसणारा लिंगाणा आम्हालाच काय तर त्याच्या माथ्यावर पाय ठेवणाऱ्या शुभम ला सुद्धा ओळखता आला नाही. रात्री कुठून कुठे उतरलो ते काहीच कळलं नव्हतं म्हणून त्याच आजोबांना सिंगापूर नाळेबद्दल विचारलं असता, त्याच लिंगण्याच्या खालून ती वाट गावात उतरते असं उत्तर मिळालं. काल रात्री जंगलात हाक मारणाऱ्या माणसंच कोडं एव्हाना सुटलं होतं, ती बा रायगड परिवाराची बोराटा नाळ उतरून लिंगाणा आरोहण करायला आलेली टीम होती आणि आम्ही त्यांना सिंगापूर नाळ उतरून येणारे गिर्यारोहक समजत होतो.

थोडक्यात फ्रेश होऊन आवराआवर केली आणि मी पुन्हा टेम्पो वाल्या दादाच्या अंगणात आलो. आता तर टेम्पो पण गायब झाला होता. म्हणजे तो दादा रात्री उशिरा येऊन पहाटे उजेडायच्या आत पुन्हा निघून सुद्धा गेला होता. आता चालत वारंगी गाठण्याशिवाय पर्याय नव्हता, शाळेत येऊन सगळ्यांना सांगितलं तर "आज रायगड सर करून रात्री पर्यंत आपापल्या घरी जाऊन उद्या कामावर हजर व्हायचं" हे ठरलेलं नियोजन बारगळणार आणि आपला रायगड हुकणार हेच सर्वांना वाटलं. टेंट आवरून चहा बनवला आणि चहा पिऊन सहज शाळेच्या बाहेर आलो तेव्हा बाजूला एका घराच्या अंगणात एक "मारुती इको" गाडी उभी असलेली दिसली आणि त्याबाजूला एक जण उभा होता. त्या दादाला गाडीबद्दल चौकशी केली तेव्हा कळलं की ती गाडी त्याचीच होती. त्याला वारंगीत सोडण्याची विनंती केली आणि त्याने लगेच माणशी शंभर रुपयाच्या मोबदल्यात ती मान्य सुद्धा केली. धावतच शाळेत आलो आणि सगळ्यांना आनंदाची बातमी सांगितली. ही गाडी सुद्धा निघून जायच्या आधी गाडीत जाऊन बसू म्हणून दोनच मिनिटांत सगळे शाळेच्या बाहेर येऊन गाडीजवळ उभे राहिलो.

सगळ्या बॅग गाडीच्या कॅरिअर वर नीट बांधून गाडीत बसलो आणि वारंगी कडे निघालो. साधारण अर्ध्या तासात म्हणजे ८ च्या सुमारास वाळणकोंड मार्गे जाताना सलग काही डोंगर एकत्र येऊन बनलेलं एक आश्चर्य म्हणजेच सह्याद्रीरूपी शिवाजी महाराज दिसले आणि सगळेच धन्य झालो. थोड्याच वेळात वारंगीत उतरलो. इको वाल्या दादांचे आभार मानले आणि त्यांचा मोबदला देऊन वारंगी पुलाकडे चालायला सुरुवात केली. अवघ्या दहा मिनिटांत पुलाजवळ येऊन पोहोचलो. इथून रायगडाचे टकमक टोक अगदी स्पष्ट दिसत होतं. पुलावर थोडा वेळ फोटोग्राफी करून सगळ्यांनी छत्री-निजामपूर गावची वाट धरली. पूल पार करत असतानाच पुन्हा एकदा काल भेटलेला महेश आणि त्याचा मित्र भेटले. कसलेले ट्रेकर असल्याने ये दोघे पटापट पुढे निघून गेले आणि आम्ही आमच्या स्पीड ने पुढची वाट धरली.

सह्याद्रीरूपी छत्रपती शिवाजी महाराज

पंधरा-वीस मिनिटांत छत्री-निजामपूर गाव मागे टाकून रायगड कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. पुढचे २ तास आम्हाला याच रस्त्याने चालायचं होतं. आधी कच्चा असणारा रस्ता थोड्या वेळात पक्क्या रस्त्याला येऊन मिळाला आणि इथून आमची अखेरची परीक्षा सुरू झाली. वरून भाजून काढणारं ऊन, अंगावर येणारा डांबरी रस्त्याचा  वळणावळणाचा चढ नकोसा वाटत होता पण पर्याय नव्हता. रायगडाचे टकमक टोक कधी डावीकडे तर कधी अगदी समोर दिसत होतं. सगळे भराभर पुढे निघून जात होते पण त्यांचा वेगाने चालायला मला शक्य होत नव्हतं त्यामुळे मी रमत गमत चालत होतो. साधारण अर्ध्या तासाने रस्त्याच्या बाजूलाच एक छोटा धबधबा बघून तिथे एक ब्रेक घ्यायचं ठरलं. थंडगार पाण्याने तोंड धुतलं आणि थकवा थोडासा कमी झाला. बसल्या जागेवरच उरलेले थेपले आणि फळं बाहेर काढून भूक शमवली. चांगला तासाभराचा ब्रेक घेऊन पुन्हा रायगडाची वाट धरली. या डांबरी रस्त्यावर मधेच काही दिशादर्शक बाण दाखवले होते जे एखाद्या शॉर्टकट ने पुन्हा त्याच डांबरी रस्त्यावर आणून सोडत होते. या शॉर्टकट्स मुळे नकोसा वाटणारा डांबरी रस्ता आम्ही काही प्रमाणात चुकवत होतो.

कंटाळवाणा वाटणारा डांबरी रस्ता आणि त्यामागे दिसणारे दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे टकमक टोक

साडे बाराच्या सुमारास असेच काही शॉर्टकट्स घेत आधी झोलाई मंदिर परिसर आणि त्यापूढे आणखी एक शॉर्टकट घेऊन थेट रायगडाच्या चित्त दरवाज्यासमोर असणाऱ्या शिवप्रसाद हॉटेल जवळ येऊन विसावलो. हॉटेल मधेच जीरा सोडा पोटात ढकलला आणि पुढे काय करायचं यावर चर्चा सुरू झाली. समोर रायगडावर जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या पण या भर उन्हातून त्या पायऱ्या चढून जायची कोणचीही ताकद राहिली नव्हती. गडावर तर जायचं पण पायऱ्या चुकवून आणि त्यासाठी एकंच पर्याय होता तो म्हणजे रोपवे. रोपवे ने साधारण १०-१५ मिनिटांत गडावर दाखल होऊ आणि ६ च्या सुमारास गड पाहून गडउतार होऊन पुन्हा आपापल्या घरी जायला निघू असं ठरवून रोपवे कडे चालायला सुरुवात केली.

दहा-पंधरा मिनिटं चालून गेलो तेवढ्यात एका लहान मुलगा आम्हाला पाहून आमच्या जवळ आला आणि सांगितलं की रोपवे साठी तब्बल ५ तासांचं वेटिंग आहे. खात्री करायला म्हणून कुलदीप आणि अतुल रोपवे ची चौकशी करायला निघून गेले.  ५ तासांचं वेटिंग म्हणजे गडावर जायला ५-५:३० होणार आणि नियमानुसार ६ पर्यंत गड सोडावा लागणार होता. आमच्यापैकी कोणालाच  हे मान्य नव्हतं शिवाय या उन्हात त्या पायऱ्या चढून जाणं सुद्धा जीवावर आलं होतं आणि उद्या ऑफिस ला सुद्धा जायचं होतं. राजगड पासून सुरू केलेला प्रवास रायगडाच्या इतक्या जवळ येऊन तेही रायगड नं करताच कोणालाच संपवायचा नव्हता. यावर आता एकंच उपाय होता तो म्हणजे आज इथे जवळपास कुठेतरी मुक्काम ठोकून उद्या सकाळी रायगड सर करायचा. बसल्या जागी सगळ्यांनी दुसऱ्या दिवशीच्या सुट्ट्या कन्फर्म करून टाकल्या. थोड्या वेळात कुलदीप आणि अतुल रोपवे ला ५ तासांची कन्फर्म वेटिंग असल्याची बातमी घेऊन परत आले. कुलदीप ला उद्या काहीही करून ऑफिस ला जाणं भाग होत शिवाय माझा सुद्धा माझ्या ऑफिस टीम सोबत संपर्क होत नव्हता त्यामुळे मला सुद्धा परत जावं लागणार होतो. मी आणि कुलदीप १:३० च्या एस.टी. ने महाड आणि पुढे मुंबईचा प्रवास करणार होतो तर बाकीचे दुसऱ्या दिवशी सकाळी चित्त दरवाज्याने रायगड सर करून संध्याकाळ पर्यंत आपापल्या घरी परतणार होते.

हॉटेल रायगड फार्म हाऊस मध्ये जेवतांना सुद्धा माझा ऑफिस टीम सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरूच होता पण तो काही केल्या होत नव्हता. पोटभर जेवून मी आणि कुलदीप ने घाईघाईतच बाकीच्यांचा निरोप घेतला कारण एस.टी. येऊन उभी होती त्यामुळे आम्ही लगेचंच महाड ला जाणाऱ्या एस.टी. मध्ये येऊन बसलो. इतका मोठा ट्रेक करून रायगड नं करता परत जात होतो याचं राहून राहून वाईट वाटत होतो. साधारण पाऊण तासांत महाड एस.टी. स्टँड ला येऊन पोहोचलो. पलीकडे महाड बोरिवली गाडी लागलेलीच होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून ऑफिस टीम ला कॉल लावला आणि अहो आश्चर्यम त्यांच्या सोबत संपर्क झाला. दुसऱ्या दिवसाच्या सुट्टी बद्दल विचारणा केली असता ती सुद्धा अनपेक्षितपणे लगेच मान्य झाली. लगेच कुलदीप ला त्याच्या ऑफिस मध्ये विचारायला सांगितलं पण त्याची सुट्टी मॅनेज होत नव्हती. एव्हाना २:३० वाजले होते. कुलदीप ला बोरिवलीच्या गाडीत बसवलं आणि लगेच रायगड ला जाणाऱ्या एस.टी ची चौकशी केली तेव्हा कळलं रायगड ला जाणारी दिवसातली शेवटची गाडी म्हणजे ज्या गाडीने मी आता रायगड पासून महाड ला आलो ती गाडी पुन्हा रायगड ला जायला पाच मिनिटांत सुटेल. थोडे पैसे काढायचे होते म्हणून धावत बाहेर येऊन ए.टी.एम. शोधायला लागलो. जवळपास होती ती सगळी ए.टी.एम. बंद होती. पुन्हा धावत एस.टी.स्टँड वर आलो तर एस.टी. गायब. चौकशी केल्यावर कळलं की एस.टी रायगड साठी नुकतीच स्टँड मधून बाहेर पडली होती. अगदी हतबल होऊन  स्टँड वरच डोकं धरून बसलो कारण सगळं जुळून येऊन सुद्धा माझा रायगड हुकणार होता.

साधरण १५ मिनिटं तिथंच बसून होतो, काय करावं काही सुचत नव्हतं. सहज म्हणून स्टँड च्या बाहेर येऊन रायगड किल्ल्याला कसं जाऊ शकतो याची चौकशी केली तर एका दुकानदाराने सांगितलं की एस.टी.स्टँड च्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर शिवाजी चौक आहे आणि तिथून हिरकणी वाडी किंवा पाचाड ला जाण्यासाठी गाडी मिळेल. दुकानदाराचे आभार मानून लगेच त्या दिशेने चालायला सुरुवात केली. घरी फोन करून आज ऐवजी उद्या घरी येईन हे कळवलं. रायगडाच्या पायथ्याला थांबलेल्या बाकीच्या मंडळींना फोन करून परत येतोय म्हणून सांगितलं. वाटेत एक ए.टी.एम. दिसलं, तिथून हवे तितके पैसे काढले. आज घरी परत जायचं म्हणून सकाळी ब्रेक घेतला तिथे होती नव्हती ती सगळी फळं आणि खायचं सामान आम्ही संपवून टाकलं होतं त्यामुळे सगळ्यांसाठी खायला संत्री घेतली आणि शिवाजी चौकात दाखल झालो. तिथे रायगड किल्ल्यासाठी जाणारी ६ सीटर गाडी तयारंच होती. गाडीत बसलो आणि गाडीने पुन्हा रायगडाची वाट धरली तेव्हा हायसं वाटलं. इतके सगळे अडथळे पार करून मी उद्या रायगडावर जाणार होतो यावर आता शिक्कामोर्तब झालं होतं. महाराजांची इच्छा, दुसरं काय.🙏

पुन्हा एकदा पाऊण तासांचा प्रवास करून मी इतर मंडळी थांबली होती तिथं पोहोचलो. तिथं थांबलेल्या बाकीच्यांनी एका हॉटेलात सगळ्यांच्या अंघोळीची सोय केली होती. काल सकाळी भट्टीत उतरलो तेव्हा तिथल्या हापश्यावर सगळ्यांनी कावळ्याची अंघोळ उरकली होती पण आता त्या हॉटेलात पद्धतशीर अंघोळ होणार होती ती सुद्धा गरम पाण्याने. अंघोळ करून सगळेच फ्रेश झाले आणि त्याच हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत निवांत चहा घेत गप्पा मारत बसलो.

कोरोना महामारी मुळे रायगडावर मुक्कामास सद्ध्या परवानगी नाही त्यामुळे गडाखालीच कुठेतरी मुक्काम करावा लागणार होता. रायगड फार्म हाऊस मध्ये संध्याकाळी नाश्ता आणि रात्रीचं जेवण उरकून पुन्हा चित्त दरवाज्याकडे चालायला सुरुवात केली. चित्त दरवाज्याच्या समोर असणाऱ्या शिवप्रसाद हॉटेल च्या बाजूने एक छोटी वाट वर जाते, या वाटेने अवघ्या दोन मिनिटांत वाघबिळ म्हणजेच नाचणटेपाची गुहा आहे तिथं येऊन पोहोचलो. इथे आजचा मुक्काम करायचं ठरलेलं पण आधीच एका चार जणांच्या ग्रुप ने तिथे टेंट लावले होते त्यामुळे पुन्हा खाली आलो आणि बाजूला असलेल्या एका दुकानात टेंट लावून तिथेच झोपायची तयारी केली. थोडावेळ गप्पा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी रायगडावर कुठे कुठे जायचं हे ठरवलं. प्रचंड थकल्यामुळे जास्त वेळ नं घालवता टेंट मध्ये जाऊन झोपून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ला उठलो आणि थोडक्यात फ्रेश होऊन तडक चित्त दरवाजा गाठला आणि रायगड चढायला सुरुवात केली. आज कसलीच घाई नव्हती त्यामुळे रमत गमत फोटोग्राफी करत ७ वाजता महादरवाजा आणि ७:३० वाजता हत्ती तलाव मागे टाकून गंगासागर तलावाजवळ येऊन पोहोचलो. तलावातील पाणी बाटल्यांमध्ये भरून घेतलं आणि राजवाड्याच्या मागून पालखी दरवाज्याने गडावर दाखल झालो. राणीवसा, मेणा दरवाजा, महाराजांचा राजवाडा डोळ्यात भरून घेत राजसदरेसमोर आलो आणि महाराजांना मुजरा केला. शुभम ने सोबत तिरंगा आणला होता त्यासोबत थोडी फोटोग्राफी केली आणि थोडा वेळ तिथेच बसून राहिलो. शक्य तितका रायगड बघून दुपारी १२ पर्यंत रायगड उतरायचं ठरलेलं. थोडा वेळ विश्रांती झाल्यावर नगारखाना, होळीचा माळ आणि बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराची वाट धरली. सोमवार असल्याने काही तुरळक पर्यटक वगळता संपूर्ण गड जवळपास रिकामा होता आणि जगदीश्वर मंदिरात प्रचंड शांतता होती जी अतिशय सुखद होती.

महाराज🙏


श्री जगदीश्वर मंदिर

जगदीश्वराच्या पिंडीवर होणाऱ्या जलाभिषेकाचा आवाज संपूर्ण गाभाऱ्यात घुमत होता इतकी शांतता तिथे होती. थोडावेळ बसून ती शांतता अनुभवली आणि मंदिरातून बाहेर येऊन महाराजांच्या समाधी समोर आलो. अपेक्षेप्रमाणे इथे सुद्धा शांतताच होती. समाधीसमोर नतमस्तक झालो आणि पुन्हा थोडा वेळ शांत बसून राहिलो. तिथे वस्तीला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आजूबाजूचा प्रदेश न्याहाळायला सुरुवात केली. समोर दिसणारं काळ नदीच पात्र, त्या पलीकडे असणारा लिंगाणा, डावीकडचा कोकणदिवा अगदी स्पष्ट दिसत होता. तसंच घाटावरून कोकणात उतरणाऱ्या बऱ्याच नाळवाटा आणि घाटवाटा सुद्धा दिसत होत्या. बऱ्याच लांबवर राजगड आणि त्यापुढे तोरणा अगदी स्पष्ट दिसत होता. थोडक्यात आमचा पूर्ण प्रवास ज्या वाटेवरून झाला तो पूर्ण भूभाग डोळ्यासमोर होता. राजगडाच्या पद्मावती मंदिरापासून सुरू झालेला प्रवास रायगडी असणाऱ्या जगदीश्वर मंदिराजवळ येऊन संपला होता.

रायगडावरून दिसणारा लिंगाणा, तोरणा आणि त्यामागे राजगड

लवकर गडउतार व्हायचं होतं म्हणून पुन्हा एकदा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढची वाट धरली. वाटेत उजवीकडे दिसणाऱ्या टकमक टोकाला सुद्धा धावती भेट दिली आणि तिथं थोडी फोटोग्राफी करून पुन्हा होळीच्या माळावरून शिरकाई मंदिराजवळ येऊन थांबलो.  भवानी कडा, वाघ दरवाजा सुद्धा बघायची इच्छा होती पण तितका वेळ गाठीशी नव्हता म्हणून पुन्हा एकदा रायगड डोळ्यात भरून गड उतरायला सुरुवात केली.

तासाभरात खाली आलो आणि पुन्हा एकदा हॉटेल रायगड फार्म हाऊस मध्ये येऊन बसलो. इतका मोठा ट्रेक केला तर थोडंस सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे म्हणून गुलाबजाम आणि कोल्ड्रिंक ची ऑर्डर दिली. थोडक्यात सेलिब्रेशन झाल्यावर महाड ला जाणाऱ्या गाडीची चौकशी करत होतो तितक्यात एक ६ सीटर गाडीवाला महाड ला जाणार का विचारत समोर येऊन थांबला. जराही वेळ न दवडता त्या गाडीत बसलो आणि महाड ची वाट धरली.


सेलिब्रेशन

महाड ला जाणाऱ्या गाडीत बसलो तेव्हा आम्ही पाच जण चांगलेच दमलो होतो. कुलदीप असता तर बरं झालं असतं हा विचार सारखा मनात येत होता शिवाय त्याचा रायगड हुकला त्याबद्दल वाईट सुद्धा वाटत होतं. आता पर्यंत जितके ट्रेक केले त्यात इतकं कधीच चाललो नव्हतो त्यामुळे अर्थात पाय बोलायला लागलेले, कोणाच्या पायांना फोड आलेले, काहींना छोटया मोठ्या जखमा झालेल्या पण प्रत्येक जण मनातून खुष होता. रायगड घेरा सोडताना प्रत्येकाच्या डोळ्यात एक समाधान दिसत होतं.

महाड ला पोहीचलो आणि एका चायनीज हॉटेल मध्ये थोडक्यात पेटपूजा करून स्टँड वर आलो. इथून अतुल पोलादपूर ला, शुभम आणि आदर्श रोह्याला तर मी आणि प्रणव मुंबईला जाणार होतो. एकमेकांच्या गळाभेटी घेऊन लवकर पुढच्या मोहिमेचं नियोजन करायच्या वायद्यावर एकमेकांचा निरोप घेतला गेला.

मी आणि प्रणवने एस.टी. महामंडळाच्या शिवशाही मधून मुंबईची वाट धरली तेव्हा गेल्या चार दिवसांत केलेली भटकंती आणि त्यासाठी महिनाभर आधीपासून केलेलं नियोजन डोळ्यासमोरून जात होतं. गुंजवणेतल्या पुरोहित काकांकडे जेवलेलो जेवण, चंद्राच्या उजेडात चोर दरवाजाने जवळ केलेली राजगडाची वाट, राजगडावरील मुक्काम, नेढं, सुवेळा माची, संजीवनी माची, अळू दरवाजा, संजीवनी माचीची भक्कम चिलखती तटबंदी कायम लक्षात राहणार होती पण बालेकिल्ला पुन्हा हुकला याची रुखरुख लागून राहिली होती. राजगड ते तोरणा या दोघांमधली १३ किलोमीटर ची टेकड्यांची वाट आतापर्यंत पाहिलेल्या वाटांमधली सगळ्यात सुंदर वाट होती पण तिच्यावरून चालताना तिचा रांगडेपणा कायमचा मनात भरून राहिला होता. तोरण्यावर अनपेक्षितपणे पडलेला मुक्काम, जनरेटर घेऊन जाणारे बा रायगड परिवाराचे सदस्य, भट्टी गावात उतरणारी निसरडी वाट यातलं काहीही डोळ्यासमोरून जात नव्हतं. भट्टी ते सिंगापूर चा प्रवास, त्यात भेटलेले जुने मित्र आणि सिंगापूरच्या पोटे मामांनी कायमचं मनांत घर केलं होतं. सिंगापूर ते दापोली हा आयुष्यातला आतापर्यंत चा सगळ्यात थरारक प्रवास ठरला होता. दापोलीतला मुक्काम, तो नं भेटलेला टेम्पो वाला आणि देवासारखा भेटलेला इको वाला, सह्याद्रीतले महाराज यांना विसरणं या जन्मी तरी शक्य नव्हतं. वारंगी पासून रायगड पर्यंत ची दमछाक करणारी चाल, अनपेक्षितपणे ट्रेक चा वाढलेला एक दिवस, त्यात माझी महाड रिटर्न वारी सुद्धा लक्षात राहिलीय.

हा ट्रेक करून साधारण सहा महिने होऊन गेलेत पण त्यातला एक एक क्षण अगदी जसाच्या तसा आजही लक्षात आहे. या भटकंतीने नवीन मित्र तर दिलेच शिवाय जुन्या मित्रांसोबत जुळलेली मैत्रीची नाळ आणखीनच घट्ट झाली यात अजिबात शंका नाही. सह्याद्रीवर असलेल्या प्रेमात कितीतरी पटींनी वाढ झालेली. पुन्हा या तीन दुर्गांच्या भेटीला आणि त्याच्या या वाटांवर कधी येऊ माहिती नाही पण तोपर्यंत या भटकंतीच्या आठवणी कायम मनाच्या एका कोपऱ्यात अगदी सुरक्षित राहणार होत्या.


धन्यवाद!!

निनाद सूर्यकांत सावंत, मुंबई.


महत्वाचे:

सह्याद्रीत फिरतांना आपण आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून वावरतोय याचं भान ठेवून कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका.

आपल्या सोबत आणलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आपल्या सोबत परत घेऊन या आणि सह्याद्रीचे पावित्र्य राखा.

आज रामायण खरंच घडलं होतं का? असं म्हणणारे उद्या छत्रपती शिवाजी महाराज होते का? हे म्हणायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीला दाखवायला गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत यासाठी गडकिल्ल्यांच्या संवर्धनात जमेल तितका हातभार लावा.




Comments

  1. I wish I could join that time

    ReplyDelete
    Replies
    1. There is always a next time buddy... So better luck next time..

      Delete
  2. कमाल 🔥
    महाडवरून रायगडाकडे जातांना तुला जितका आनंद झाला असेल ना तितकाच हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला होईल ही खात्री आहे ❤️
    खूप फिर... आणि असंच लिहीत राहा 🤘🏻

    ReplyDelete
  3. खूप छान लिहतो रे निनाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलंग मदन "कुलंग"

भटकंती दुर्गत्रिकुटांची