स्वप्नपूर्ती
2016 च्या जानेवारी पासून ट्रेक करायला सुरुवात केली. तेव्हा पासून आत्ता पर्यंत वीस-एक ट्रेक केलेत. सगळे एक-से-एक होते पण मला खरी ओढ होती ती पंढरीची, अर्थात ट्रेकर्स ची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्र गडाची. हरिश्चंद्र गडावर जाण्याच्या अनेक वाटा आहेत असं ऐकून होतो पण त्यातही सर्वात कठीण समजली जाणारी वाट म्हणजे नळीची वाट. जेव्हा हरिश्चंद्र गडाबद्दल आणि नळीच्या वाटेबद्दल ऐकलं तेंव्हाच ठरवलं, हरिश्चंद्रगड हजारदा करू पण सुरुवात करायची ती नळीच्या वाटेनेच. नळीच्या वाटेचे अनेक इव्हेंट झाले पण काही ना काही कारणाने ती वाट हुलकावणी देत होती आणि आता तब्बल दोन वर्षांनी तो योग जुळून आला. Midas adventures या ग्रुप चा 28-29 oct चा हरिश्चंद्र गडाचा प्लॅन पहिला आणि ठरवलं, काहीही झालं तरी यावेळी जायचंच. माझ्याच ऑफिस मधली माझी खूप चांगली मैत्रीण आरती. हिला एकदा मी गडाबद्दल सांगत असताना तिथली केदारेश्वर गुहा आणि शिवलिंगाचे फोटो दाखवले तेव्हा पासून ध्यास घेऊन बसलेली की हरिश्चंद्र करायचाच म्हणून ते ही नळीच्या वाटेने. आरती ने माझ्या सोबतच 3-4 ट्रेक केलेले, तिचा स्टॅमिना आधी पाहिलेला आणि ती कर...