अलंग मदन "कुलंग"
२०२० मध्ये महाशिवरात्री च्या सुमारास बा रायगड परिवारासोबत अलंग मदन आणि कुलंग च्या भेटीला पहिल्यांदा आलो. तेव्हा अलंग आणि मदन तर सर केला पण कुलंग च्या पायऱ्यांपर्यंत येईपर्यंत खूप जास्त दमलो होतो त्यामुळे कुलंग सर नं करताच परत आलो होतो. अलंग आणि मदन सारखे कठीण किल्ले सर केले पण त्यामानाने सोप्पा असलेला कुलंग नाही केला म्हणून बरीच चेष्टा सहन केली आणि हे सुरू असतांनाच २०२१ मध्ये बा रायगड परिवाराची पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्याच दुसऱ्या दिवशी असणारी अलंग मदन कुलंग मोहीम जाहीर झाली.
बस्स ठरवलं यावेळी कुलंग करायचा आणि ते पण अलंग आणि मदन सहित. मोहिमेच्या १५ दिवस आधी मोहीम शुल्क भरून जागा नक्की केली. ऐन मार्च मध्यात ही मोहीम असल्याने उन्हाचा तडाखा बसणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली. आवश्यक ती खरेदी करून ११ मार्च ची आतुरतेने वाट पाहू लागलो.
अखेर तो दिवस उजाडलाच. ११ मार्च च्या रात्री किसन दादांसोबत बाईक वरून ठाणे गाठले आणि तिकीट काढून प्लॅटफॉर्म नंबर १ वर ट्रेन ची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात राणे दादा आणि आणखी दोघे सुद्धा आमच्यात येऊन सामील झाले. ट्रेन यायला काहीच वेळ शिल्लक होता आणि आमच्या गप्पा सुरु होत्या. इतक्यात एक अनौन्समेंट कानावर आली, " प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर येणारी लोकल कसारा ला जाणारी धीमी लोकल आहे." आम्ही वाट बघत होतो प्लॅटफॉर्म नंबर १ वर आणि ट्रेन येत होती ५ नंबर ला. लगेच सगळे धावत सुटलो, पुलावर असतांना खाली ट्रेन येताना दिसली आणि वेग वाढवत उतरून ट्रेन पकडली. ट्रेन मध्ये विशाल, अजिंक्य, पिंट्या यांच्यासह आणखी काही मंडळी होती. गप्पा मारत रात्री दीड च्या सुमारास कसारा स्टेशन ला स्टेशन ला उतरलो. सर्व सदस्यांची शिरगणती करून आधीच ठरवलेल्या २ जीप मधून आम्ही जवळपास १७ मुंबईकर कसारा घाटात लागणाऱ्या बाबा का ढाबा मध्ये चहा घेऊन आंबेवाडी या अलंग किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाकडे रवाना झालो.
आंबेवाडी गावात पोहोचलो तेव्हा रात्रीचे ३ वाजले होते. बऱ्याच सदस्यांनी बॅग मधून टेंट वगैरे काढून / अंथरून लक्ष्मण दादांच्या अंगणात ताणून दिली. मी आणि विशाल आम्हाला झोप तर येत नव्हती त्यामुळे गप्पा मारत बसलो. थोड्या वेळात पुणेकर आणि सांगलीकर मंडळी सुद्धा आम्हाला येऊन मिळाली. सकाळी ५:३० च्या दरम्यान प्राथमिक विधी उरकून, चहा-पोह्याचा नाश्ता करून आणि जेवणाच्या साहित्याचे व चढाईच्या सामानाचे वाटप करून हेडटॉर्च च्या प्रकाशात सगळे अलंग किल्ल्याकडे मार्गस्थ झालो.
संधीप्रकाशात दिसणारा अलंग किल्ला,
डांबरी रस्त्यावरून डावीकडे मातीच्या रस्त्याला लागलो आणि साधारण १५ मिनिटांत वाट चढणीला लागली. मजल दरमजल करत दोन तासांत हनुमान शिल्पाजवळ पोहोचलो.
हनुमान शिल्प
वेळ नं दवडता मारुतीरायचे दर्शन घेऊन पुढच्या वाटेला लागलो. पुढे अर्ध्या तासांत कातळात खोदलेल्या पायऱ्यांजवळ पोहोचलो.
अलंग किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या,
योग्य ती खबरदारी घेत त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या चढतांना पुढे गेलेल्या टीम पैकी आंबेवाडीचे लक्ष्मण दादा अलंग चा ७० फुटी कातळटप्पा कोणत्याही साहित्याविना सर करतांना दिसले. १५ ते २० मिनिटांत अलंग आणि मदन किल्ल्यांच्या मध्ये लागणाऱ्या गुहेत दाखल झालो. तिथे वजनदार बॅग्स ठेवल्या आणि छोट्या बॅग मध्ये पिण्यासाठी लागणारे पाणी थोडा खाऊ घेऊन अलंग किल्ल्याकडे वळलो. गुहेच्या बाजूलाच अलंग किल्ल्याचा २०-२५ फुटाचा टप्पा सर करून आणि त्यापुढच्या पायऱ्या पार करून मुख्य कातळाखाली येऊन थांबलो. प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने तो कातळकडा सर करत होते.
अलंग चा २५ फुटी पहिला रॉक पॅच,
अलंग चा ७० फुटी दुसरा रॉक पॅच,
माझा नंबर आल्यावर मी सुद्धा हारनेस लावून तो कातळटप्पा सर करायला सुरुवात केली. आधी होल्ड्स मिळतील तसं वर गेलो नि नंतर होल्ड मिळेनासे झाले तेव्हा गाठी मारलेला रोप पकडून वर गेलो आणि वरच्या गुहेत पोहोचलो. हारनेस काढून दिला आणि थोडी विश्रांती घेऊन अलंग च्या पायऱ्या चढू लागलो. डाव्या बाजूला अखंड कातळ आणि उजव्या बाजूला खोल दरी असल्याने इथे सुद्धा सुरक्षेसाठी रोप होताच. गडमाथ्यावर दाखल झालो आणि जराही वेळ नं दवडता गडफेरीसाठी निघालो. सर्वात आधी उजव्या बाजूला निघालो, तिथं बुजलेलं एक पाण्याचं टाकं आणि काही अवशेष दिसले. आणखी पुढे गेलो आणि तिथून मदन गडाचं अप्रतिम दिसणारं दृश्य डोळ्यात आणि फोटोरूपाने मोबाईल मध्ये भरून घेतलं. गडाच्या या बाजूने मदन गडाच्या खालच्या पायऱ्या अतिशय सुंदर दिसत होत्या तर वरच्या बाजूला असणाऱ्या वळणावळणाच्या पायऱ्या काळजात धडकी भरवत होत्या. थोडी फोटोग्राफी करून गडाच्या दुसऱ्या बाजूला निघालो.
अलंग किल्ल्यावरून दिसणारा मदन किल्ला,
वाटेत आणखी एक बुजलेली विहीर सदृश्य बांधकाम आणि त्यात एक शिवलिंग दिसलं. गुहेत पोहचून थोडा आराम केला आणि बॅग मधून आणलेली संत्री फस्त केली.
विहीर सदृश्य बांधकाम आणि शिवलिंग,
थोड्याच वेळात गुहेच्या बाजूला असणाऱ्या पायर्यांनी गडाच्या वरच्या बाजूला फेरफटका मारण्यास निघालो. काही अंतर चढून गेलो तोच डाव्या बाजूस स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या ११ पाण्याच्या टाक्या नजरेस पडल्या. ११ पैकी एकाच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य होत. त्यातलं पाणी पोटात आणि बॅग मधल्या बाटल्यांमध्ये भरून घेऊन राजवाड्याच्या दिशेने निघालो.
अलंग किल्ल्यावरील गुहा,
संपूर्ण गडावरून राजवाड्याची एकच बाजू दिसत होती पण खरं बघता वाडा बराच मोठा होता आणि त्याच्या दोन बाजूच्या भिंती ऊन, वारा आणि पावसाचा वारा झेलत दिमाखात उभ्या होत्या.,
राजवाडा,
राजवाड्याच्या खिडकीजवळ मनसोक्त फोटोग्राफी करून गडावर असलेला शिलालेख बघायला निघालो. वाड्याच्या पुढे डाव्या बाजूला आणखी दोन पाण्याची टाकी दिसली जी काठोकाठ भरलेली होती पण त्यातलं पाणी मात्र पिण्यायोग्य नव्हतं. थोडं पुढे उजव्या बाजूला एका महादेवाच्या पिंडीभोवती दगड रचून चौथरा बनवला होता आणि त्यापैकी एका दगडाला टेकवून तो कोरलेला शिलालेख उभा केला होता.
शिलालेखाच्या पुढच्या बाजूस आणखी काही गुहा होत्या पण ऊन वाढत होतं त्यामुळे तिथं नं जाता आम्ही पुन्हा मागे गुहेकडे पावलं वळवली. गुहेजवळ पोहोचेपर्यंत सर्व मंडळी गड चढून आली होती. बरेच जण गडभ्रमंती करत होते तर काही विश्रांती घेत होते. मंडळी गड फिरून येईपर्यंत आम्ही तिथे गप्पा मारत बसलो आणि सगळे आल्यावर ग्रुप फोटो काढून गड उतराईच्या तयारीला लागलो.
With Mr.अजिंक्य पॉल,
अलंग उतरतांना आधी कातळातल्या पायऱ्या उतरायच्या होत्या आणि त्यानंतर तो सरळसोट ७० फुटी कडा रॅपलिंग करून उतरायचा होता. सुरक्षेच्या दृष्टीने आत्ताही पायऱ्यांजवळ दोर होताच, तो दोर धरून योग्य ती काळजी घेत रॅपलिंग पॉईंट पर्यंत पोहचलो. रॅपलिंग करतांना वर उभे असलेले लक्ष्मण दादा आणि संतोष दादांसह सर्व साहित्यावर विश्वास ठेवला आणि अगदी काही वेळातच तो कडा रॅपल करून खाली आलो. त्यापूढे असणारा २५ फुटी कडा सुद्धा उतरून खाली आलो आणि आमच्या बॅग्स होत्या त्या गुहेत येऊन थांबलो. एव्हाना दुपारचा एक वाजून गेला होता त्यामुळे पोटात भुकेने कावळे ओरडत होतेच. सगळ्यांनी सोबत आणलेला सुका खाऊ बाहेर काढला त्यात भेळ, बिस्किट्स, नाशिक चिवडा, राजगिरा चिक्की असे विविध जिन्नस होते. मनसोक्त पोटपूजा करून सगळ्यांची पावलं मदन गडाकडे वळली तेव्हा घड्याळात २ वाजले होते.
मदन गडाकडे जाण्यासाठी अलंग गडाला ट्रॅव्हर्स मारावा लागतो. वाट धोकादायक नसली तरी योग्य ती खबरदारी घेत थोड्याच वेळात अलंग आणि मदन च्या खिंडीत येऊन पोहोचलो. थेट डावीकडे उतरणारी वाट साम्रद गावात उतरत होती, मदन गडाच्या डावीकडची वाट कुलंगकडे तर उजवी वाट मदन किल्ल्यावर घेऊन जाणारी होती. आम्ही उजव्या वाटेला लागून मदन च्या दिशेने पावलं वळवली. अगदी पाचंच मिनिटांत मदन गडाच्या पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या चढून जाताना उजवीकडची दरी भीती घालत होती. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर पुढे आमची माणसं मदन गडाचा कातळटप्पा पार करण्यासाठी रांग लावून बसली होती. त्यामुळे बसलो होतो तिथंच थोडी फोटोग्राफी केली आणि निवांत पडी टाकली. पुढच्या मंडळींनी आवाज दिल्यावर झोप बाजूला सारून पुढं चालायला सुरुवात केली.
आम्ही जिथे झोपलो होती त्याच्या थोडंच पुढे मदन गडाचा एक धोकादायक टप्पा होता तिथे सुद्धा दोर लावून तो टप्पा सुरक्षित केला होता. पुढे आणखी काही पायऱ्या आणि पूढे डाव्या बाजूला अंदाजे ५० फुटाचा कातळटप्पा आमची वाट बघत होता. हा कातळटप्पा आम्हाला बॅग घेऊन येंगायचा होता. कातळाजवळ किसन दादा वर जाणाऱ्यांना बिले देत होता. त्याला विनंती केली की जमल्यास बॅग दोराने आधी वर पाठवून दे तर दादाने सांगितलं बॅग वर पाठवताना फाटली किंवा खाली पडली तर काय करणार? नवीन बॅग चं असं काही होईल याची कल्पनाच करू शकत नव्हतो त्यामुळे बॅगसकट तो टप्पा चढायला लागलो. सुरक्षितपणे तो टप्पा पार केला आणि वर जाऊन बसलो. हा कातळटप्पा पार करून आपण मदन गडाच्या माथ्यावर आलो असं वाटतं पण गडमाथा अजून बराच लांब आहे हे आधीच्या मोहिमेवरून चांगलंच लक्षात होतं.
मदन गडाच्या पायऱ्या,
पुन्हा एकदा मदन गडाच्या माथ्याला ट्रॅव्हर्स मारून आणि घसारा पार करून मागच्या बाजूच्या पायऱ्यांजवळ पोहोचलो. याच वळणावळणाच्या धडकी भरवणाऱ्या पायऱ्या आम्ही सकाळी अलंग गडावरून पहिल्या होत्या. सावधपणे पायऱ्या पार करून पुढच्या १० मिनिटांत गडमाथ्यावर दाखल झालो. टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन पुढे असणाऱ्या झाडाच्या अलीकडे तंबू ठोकले. खरंतर वरच्या गुहेत राहायची इच्छा होती पण तिथं आधीच एक ग्रुप वास्तव्यास होता. तंबू ठोकून झाल्यावर सूर्यास्त बघायला कुलंग च्या बाजूला असणाऱ्या मदन गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आलो. आमची फोटोग्राफी सुरू होतीच तितक्यात दुपारी आपली आग ओकणारा सूर्याचा तो महाकाय गोळा आपली आग शमवून कुलंग च्या आड होत होता. समोर दिसणारे दृश्य भारावून टाकणारं होतं. आमच्या डोळ्यादेखत तो महाकाय आगीचा गोळा कुलंगच्या आड गेला तेंव्हाच आम्ही भानावर आलो. एकवेळ डोळे भरून कुलंग ला बघून घेतलं, उद्या काहीही करून गेल्या वेळेस राहिलेली कुलंग किल्ल्याची कसर भरून काढायची होती. येतोच उद्या तिथं असं मनातल्या मनात म्हणून तंबूची वाट धरली.
पाण्याच्या टाक्याजवळ येऊन बसलो तेव्हा सर्वांची काही ना काही बनवायची लगबग सुरू होती. संतोष दादाने तर मीठ लावून तळलेल्या बटाट्याचे काप समोर आणून ठेवले. त्याची सर मॅकडोनाल्डस मधल्या फ्रेंच फ्राईस पेक्षा भारी होती. त्यानंतर द्राक्ष, गाजर असं काही ना काही समोर येत राहिलं आणि आम्ही त्याचा फडशा पाडत होतो. जेवणाला वेळ होता आणि काल रात्री झोप नव्हती झाली म्हणून तंबूत परतलो तितक्यात अजिंक्य आणि विशाल सुद्धा तंबूत आले. मग झोप राहिली बाजूला आणि तिघे मस्त गप्पा टाकत बसलो. साधारण तासाभराने जेवणासाठी बोलावणं आलं. तिघेही बाहेर आलो तर मसालेभाताचा घमघमाट सुटला होता आणि त्याच्या सोबतीला होते पापड आणि लोणचं. या अश्या जेवणाची सोय फाईव्ह स्टार च्या जेवणाला सुद्धा नाही येणार. मसालेभात खूपच चविष्ट झाला होता. पोटभर जेवून लगेच तंबूत शिरलो आणि पुढच्या पाचंच मिनिटांत निद्रादेवीला शरण गेलो तेव्हा घडाळ्यात साडे नऊ वाजलेले.
फाईव्ह स्टार मधला मसालेभात,
सकाळी कसल्याशा आवाजाने जाग आली तेव्हा साडे सहा वाजले होते. एखाद्या ट्रेक ला इतकी झोप घेण्याची ही पहिलीच वेळ होती. गार वारा सुटलेला असल्याने उठायची इच्छा होत नव्हती पण आज माझ्यासाठी महत्वाचा दिवस होता कारण आज कोणत्याही परिस्थितीत मला कुलंग सर करायचाच होता.
काल संध्याकाळी जितका अप्रतिम सूर्यास्त पहिला तितकाच सुंदर सूर्योदय आत्ता कळसुबाई च्या मागून होताना दिसत होता. काल जो आगीचा गोळा आपली आग कमी करताना दिसलेला आज तोच गोळा ती आग ओकण्याच्या तयारीत होता. या सह्याद्रीच्या कुशीतून प्रत्येकाने एकदा तरी सूर्योदय आणि सूर्यास्त पहावाच. सह्याद्रीचे हे आगळेवेगळे रुप आपल्याला मोहात पाडल्याशिवाय राहत नाही.
सूर्योदय,
सूर्योदय पाहून झाल्यावर चहा पोह्याचा नाश्ता आवरला आणि गड उतरायला सुरुवात केली. आम्ही गड उतरताना आमच्या व्यतिरिक्त आणखीही काही मंडळी होती त्यामुळे रॉक पॅच जवळ बराच वेळ बसून राहावं लागलं. अखेरीस नंबर आल्यावर तो रॉक पॅच रॅपल करून उतरलो. धोकादायक वळण पार करून आणि पायऱ्या उतरून पुन्हा अलंग आणि मदन च्या खिंडीत येऊन पोहोचलो. पुढे गेलेली मंडळी तिथंच थांबली होती म्हणून आम्ही सुद्धा मागून येणाऱ्या सदस्यांची वाट पाहात तिथंच थांबून राहिलो. मागची मंडळी आल्यावर सगळ्यांनी एकत्र च कुलंग च्या दिशेने वाटचाल सुरू केली.
आता कुलंग कडे जाण्यासाठी मदन किल्ल्याला मागच्या बाजूने ट्रॅव्हर्स मारावा लागणार होता. या वाटेवर सुद्धा डाव्या बाजूला खोल दरी आणि उजव्या बाजूला मदन गडाचा कातळ होता. साधारण अर्ध्या-पाऊण तासाने रणरणत्या उन्हात मदन चा ट्रॅव्हर्स पूर्ण झाला. आता मदन किल्ल्याला सोडून आम्हाला कुलंग च्या बाजूला जायचे होते. ही वाट गेल्या वर्षी आलो तेव्हा खुपचं घसरडी होती पण यावेळेस मात्र तितका घसारा जाणवत नव्हता, त्यामुळे रोप नं लावताच सगळे तो टप्पा उतरू लागले. सर्वजण सुरक्षितरीत्या तिथून उतरल्यावर आम्ही कुलंगला भिडलो आता आम्हाला कुलंग ला ट्रॅव्हर्स मारायचा होता तो थेट कुलंग च्या पायऱ्या लागेपर्यंत. सूर्य आपल्या परीने आग ओकत होताच, त्यात सर्वजण कुलंगच्या पायऱ्या जवळ करत होते. साधारण तासाभराने काही चढ-उतार पार करून सगळे कुलंगच्या पायऱ्यांजवळ पोहोचलो. आमच्यातल्या काही जणांनी आधीच त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली होती.
कुलंगकडे जाणारी वाट,

एव्हाना दुपारचे २ वाजायला आले होते त्यामुळे गड उतरायला सुरुवात केली. अगदीच रमत गमत लक्ष्मण दादांच्या घरात पोहोचलो तेव्हा घड्याळात ४:३० वाजले होते.
कुलंगच्या पायऱ्या उतरतांना मी, अजिंक्य, किसन दादा आणि श्याम दादा,
आंबेवाडीतल्या लक्ष्मण दादांचे विशेष आभार, तसंच कोर टीम मधल्या संतोष दादा, किसन दादा, राणे दादा, संजय सर, वैभव ढेकणे, गणेश सोनावणे यांचेसुद्धा आम्हा सगळ्यांकडून ही भटकंती यशस्वीरीत्या पूर्ण करून घेतल्या बद्दल आभार. या भटकंतीत आयुष्यभर लक्षात राहणारे विशाल, अजिंक्य आणि पिंट्या यांसारखे जीवाला जीव देणारे मित्र मिळाले. सह्याद्रीतील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या दुर्गत्रिकुटांना अत्यंत निडरपणे भिडणाऱ्या शुभदा आणि वेदांत यांचे विशेष कौतुक.
कोर टीम, क्लॉकवाईज - लक्ष्मण दादा(आंबेवाडी), गणेश सोनावणे, संजय करपे सर,
संतोष दादा, राणे दादा आणि किसन दादा
आयुष्यात खूप स्वप्न पाहू पण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद वेगळाच होता. लक्ष्मण दादांच्या घरून निघालो तेव्हा एक ध्यास घेऊन निघालो ते म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी या दुर्गत्रिकुटांच्या भेटीला यायचंच.
निनाद सूर्यकांत सावंत, मुंबई
महत्वाचे:
सह्याद्रीत फिरतांना आपण आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून वावरतोय याचं भान ठेवून कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका.
आपल्या सोबत आणलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आपल्या सोबत परत घेऊन या आणि सह्याद्रीचे पावित्र्य राखा.
आज रामायण खरंच घडलं होतं का? असं म्हणणारे उद्या छत्रपती शिवाजी महाराज होते का? हे म्हणायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीला दाखवायला गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत यासाठी गडकिल्ल्यांच्या संवर्धनात जमेल तितका हातभार लावा.







































घरबसल्या ट्रेक घडवलास 😍 खूप छान लिहलंयस 🙌🏻
ReplyDeleteधन्यवाद🙏
Delete