असावा गडसंवर्धन मोहीम
नोव्हेंबर २०२० पासून बा रायगड परिवारासोबत किल्ले असावा गडसंवर्धन मोहिमेत सहभाग घ्यायला सुरुवात केली, त्यानंतर ही आजची माझी चौथी मोहीम. दहिसर ते बोईसर असा ट्रेन चा तर बोईसर ते बरीपाडा असा रिक्षा चा प्रवास करून रात्री १२:३० च्या सुमारास मामांच्या घरी पोहोचलो. केतन दादा, वैभव मोरे दादा, विनायक दादा आणि आणखी बरीच मंडळी आमच्या आधी पोहचून मॅगी वर तुटून पडली होती. मी, कुलदीप, विजय दादा, सिद्धार्थ दादा, सुरज दादा आणि तन्मय दादा पोहोचलो तेव्हा परिवरातल्या रोशन दादा च्या वाढदिवसानिमित्त केक कापून "आगळ्या वेगळ्या पद्धतीने" वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करुन झाल्यावर आम्ही शिल्लक राहिलेल्या आणि कळशीभर पाणी प्यायलेल्या मॅगी वर हल्ला चढवला आणि पोहे चहा साठी लागणार जिन्नस आणि संवर्धन कार्यासाठी लागणारी शस्त्र घेऊन १:३० वाजता गडचढाईला सुरुवात केली.
अर्ध्या तासात पहिल्या पठारावर पोहोचलो आणि तिथे पहिला छोटा ब्रेक घेतला. पुढे चालायला सुरुवात केली तेव्हा पुढे केतन दादा, कुलदीप आणि काही मंडळी होती आणि त्यांच्या मागून आम्ही ४-५ जण चालत होतो. पुढच्या १० मिनिटांत पुढची मंडळी थोडी पुढे निघून गेली होती आणि आम्ही सरळ चालत होतो. पुढे चालणाऱ्या मंडळींना वाटेबद्दल साशंकता होती म्हणून थोडं पुढे जाऊन चालत राहिलो आणि आमच्या मागून आणखी ४-५ जण आले, तेवढ्यात थोड्या खालच्या बाजूने कुलदीप आणि केतन दादांचे आवाज यायला लागले तरी आम्ही सरळ जात राहिलो. शेवटी वाट चुकल्याची खात्री झाली आणि केतन दादाला आवाज देत पुन्हा मागे चालायला सुरुवात केली. पाचंच मिनिटांत उजव्या बाजूने दोन बॅटऱ्या धावत येताना दिसल्या. केतन दादा आणि विजय दादा आमच्या दिशेने धावत येत होते आणि ते भेटले तेव्हा जीवात जीव आला. योग्य मार्गाला लागून पुन्हा गड सुरुवात करायला सुरुवात केली आणि २० मिनिटांत ऑफिशियल हॉल्ट असलेल्या कातळाजवळ येऊन थांबलो. तिथे आधी पोहोचलेली मंडळी आमची वाट बघत बसली होती. ४ वेळा असावा ला येऊन सुद्धा वाट चुकल्यामुळे समस्त मंडळींनी एकमताने माझं "वाटाड्या" असं नामकरण केलं आणि आता पूर्ण दिवस आपल्याला हेचं ऐकायचं आहे याची खात्री पटली. आम्हाला शोधायला आलेले केतन दादा आणि विजय दादा आम्ही ज्या वाटेवर चुकलो ती वाट बंद करून आमच्या जवळ पोहोचले तेव्हा आम्ही पुढचा गड चढायला सुरुवात केली. पुढच्या २० मिनिटांत अंगावर येणारा आणि दमवणारा चढ संपवून तोफेच्या खालच्या पठारावर पोहोचलो आणि उजवे वळण घेऊन महादरवाज्याजवळ पोहोचलो तेव्हा घड्याळात ३ वाजले होते.
तिथे पोहोचल्यावर काही जण नव्याने सापडलेल्या पाण्याच्या टाक्याकडे जाण्यासाठी पायवाट बनवायला गेले तर आम्ही बाजूच्या मोकळ्या जागी जाऊन थोडी फोटोग्राफी करून निद्रादेवीला शरण गेलो.
सकाळी ५ वाजता जाग आली तेव्हा बाकीची मंडळी पायवाट बनवून आम्ही होतो तिथे आलेली होती. थोड्याचं वेळात शस्त्रपूजन करून महादरवाज्याच्या वाटेतली माती काढायला सुरुवात केली तर काहीजण आधीच्या मोहिमेत काढलेली माती चाळायचं काम करू लागली.
सात वाजण्याच्या सुमारास सूर्योदय झाला तेव्हा परिवारातल्या रणरागिनींनी उत्कृष्ट पोहे आणि चहा समोर आणून ठेवला आणि पडत्या फळाची आज्ञा मानून सगळे त्यावर तुटून पडले. नाश्ता करताना "मल्हार वारी" गाण्यात सगळ्यांनी सूर मिसळले आणि धम्माल उडवून दिली.
पुन्हा कामाला सुरुवात केली, दरवाज्याजवळ मोठे मोठे दगड मिळत होते ते बाजूला काढण्याचं काम पहारीच्या साहाय्याने जोमात सुरू होतं. काही जण माती मोकळी करत होते, काही मोकळी केलेली माती भरून रांग बनवून मातीच्या ढिगाऱ्यात ओतत होते. तर पाणी मंत्री नेहमीप्रमाणे सगळ्यांची क्षुधा भागवत होते. काही वेळानंतर सह्याद्रीचे वारकरी हा ग्रुप गडावर दाखल झाला आणि त्यांनी सुद्धा संवर्धन कार्यात मोलाचा सहभाग दाखवला.
दुपारी १२:३० च्या सुमारास केतन दादांच्या सूचनेप्रमाणे काम थांबवण्यात आले आणि सर्व साहित्य आणि इतर समानांची जमवाजमव करून गड उतरायला सुरुवात केली. साधारण तासाभरात भल्या थोरल्या उन्हातून मामांच्या घरी पोहोचलो. तोंडावर विहिरीतले गार पाणी मारले तेव्हा उन्हातून गड उतरून आलेला थकवा कुठल्या कुठे निघून गेला.
जेवणाच्या कामात थोडीफार मदत करून मामांच्या अंगणात थोडा वेळ पाठ टेकत नाही तोच केतन दादांनी उठवून बसवलं आणि सगळ्यांना आपापले अनुभव सांगायला लावले. प्रत्येकाने आपल्याला जमेल तसं आपापले अनुभव कथन केले. शेवटी केतन दादांनी एक आठवण संगीतली ती अशी,
केतन दादा : "गडावर मोठ्या टाक्याचं काम केल्यानंतरच्या पावसाळ्यात तन्मय सहज गडावर गेला होता आणि तेव्हा त्याने तिथून मला कॉल केला आणि म्हणाला, दादा मोठं पाण्याचं टाकं काठोकाठ भरून वाहू लागलंय. हे वाक्य ऐकून अक्षरशः रडायला आलं मला."
ही आठवण सांगतांना सुद्धा केतन दादा किती भावनाविवश झाले हे तिथे उपस्थित सगळ्यांनीच पाहिलं. जेव्हा आपण केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळतं तेव्हा काय वाटत असेल हे सगळ्यांनीच अनुभवलं.
माती चाळताना मिळालेले काही अवशेष जसे की भांड्यांचे अवशेष, चुन्याची डबी हे सुद्धा सगळ्यांना दाखवण्यात आले.
थोड्याचं वेळात आपल्या ताईंनी गरमागरम पुलाव आणि गोडाचा शिरा समोर आणून ठेवला आणि या असावा संवर्धन मोहिमेची गोड सांगता केली.

Comments
Post a Comment