माथेरान व्हाया सनसेट पॉईंट

ऑगस्ट महिन्यातला एक रविवार, वेळ सकाळी ४:३०, मोबाईल च्या अलार्म ने जाग आली पटकन. आठवड्यातल्या बाकी दिवशी आई ने १० वेळा हाक मारली तरी जाग येत नाही तर त्या अलार्म चं काय!!! पण ट्रेक ला जायचं असलं की खाडकन उठून बसतो मी. सकाळचे सोपस्कार उरकून ५ वाजता घरून निघालो आणि १० मिनिटांत दहिसर स्टेशन ला पोहोचलो तिथून ५:२० च्या चर्चगेट लोकल ने दादर आणि मग कुर्ला मार्गे पनवेल स्टेशन ला उतरलो तेव्हा ७:२० झालेले. १० मिनिटात पनवेल एस.टी. स्टँड ला पोचलो आणि पोटपूजा म्हणून बरीच ख्याती असलेल्या विसावा हॉटेल मध्ये मिसळ खाण्यासाठी विसावलो.



तर हा सगळा खटाटोप होता तो अर्थातच ट्रेक साठी. माथेरान via सनसेट पॉईंट, मायबोलीकर असलेल्या यो रॉक्स च्या ब्लॉग वर त्याचा माथेरान आणि पेब चा लेख वाचल्या पासून हा ट्रेक करायची खूप इच्छा होती. मुंबई मध्ये राहून सुद्धा माथेरान ला नं गेलेले कदाचित माझ्यासारखे क्वचितच असतील. तर काही न काही कारणाने माथेरान हुलकावणी देत होता. मागे तर एकदा माथेरान करायला म्हणून निघालो आणि कर्नाळा करून आलो होतो, अर्थात त्याची कारणं सुद्धा होती. बर्याच जणांना विचारलं पण कोणीच तयार होईना म्हटलं कोई नाही तो एकेले सही पण जायचंच.




तर विसावा ची मिसळ पाव आणि चहा पोटात ढकलून पून्हा एस.टी. स्टँड ला आलो. मला जायचं होतं धोदाणी या गावी. ८:१५ ची एस.टी. बस ८:५० ला आली आणि प्रवास सुरु झाला. नवीन पनवेल च्या ब्रिज वरून बस पनवेल-माथेरान मार्गावरून धोदाणी कडे रवाना झाली आणि आपण माथेरान करतोय यावर शिक्कामोर्तब झालं. कारण पनवेल स्टेशन ला असताना कलावंतीण आणि प्रबळगड च्या पायथ्याला जाणारी ठाकूरवाडी बस पाहून घालमेल सुरू झालेली आणि कलावंतीण म्हणजे एकदम फेवरेट आपला, कधीही जायला तयार असतो. माझ्या मित्राच्या मते कलावंतीण वर मी झोपडी बांधलीय आणि बायको ठेवलीय तिथे म्हणून सारखा जातो.😂😂😂





असो...
तर दोधाणी ला जाताना बस मध्ये बाजूची सीट रिकामीच होती तर आणि बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती, सवयीप्रमाणे बंद असलेली खिडकी उघडली आणि बाजूच्या रॉड वर मान टेकवून पडणाऱ्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर घेत राहीलो. नरे, वाजे, गढे ही गावं पार केल्या नंतर गडेश्वर तलावाच्या बाजूने दोधानी ला जायला वाट होती. रस्त्याची अवस्था ठीक-ठाक होती आणि रस्त्याच्या दुतर्फा पसरलेलं हिरवंगार रान आणि त्यापलीकडे पसरलेली धुक्याची चादर बघता बघता कधी गावात पोचलो कळलंच नाही.
एस.टी. महामंडळाची बस दोधाणी गावातील राम मंदिराबाहेर सोडते. मंदिराच्या पुढे पेव्हर ब्लॉक ने बांधून काढलेली वाट दोधाणी धबधबा आणि पुढे माथेरानच्याच मंकी पॉईंट ला घेऊन जाते. बस मधून बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर असलेल्या जागेत एस.टी. च्या खडखडटाने आखडलेले पाय मोकळे केले. तिथंच उभ्या असलेल्या एक मुलाला वाटेबद्दल विचारलं तर कळलं की राम मंदिर आणि त्या घराच्या मधून गेलेली वाट माथेरान च्या सनसेट पॉईंट ला घेऊन जाते. हवी ती माहिती मिळाली होती त्यामुळे जास्त वेळ नं दवडता माथेरान पादाक्रांत करायला सुरुवात केली.



घराच्या बाजूने जाणारा रस्ता बराच निसरडा होता त्यावरून दोन वेळा पडता पडता वाचलो. पूढे डावीकडे वळून आणखी एका निसरड्या वाटेने मुख्य वाटेला लागलो. यो रॉक्स च्या ब्लॉग वरून आधीच माहिती होत की वाट सोपी आणि सरळ आहे, तरीही वाटेत चिल्ली-पिल्ली दिसतील त्यांना विचारत चालत होतो. पुढे जाताना डावीकडे माथेरान चा धुक्यात लपलेला डोंगर दिसत होता. मध्ये रस्त्याला २ फाटे फुटले, एक डावीकडे डोंगरात जात होती आणि दुसरी सरळ जाऊन कुठं तरी अदृश्य झालेली दिसली. डोंगरात जायचं म्हणून डावीकडची वाट धरून चालायला सुरुवात केली.
10 मिनिटाच्या चढाई नंतर वाटेत एक मोठा धबधबा लागला तो पार केला आणि लगेचंच थोडी चढण सुरू झाली. पूढे वाट बऱ्यापैकी दाट जंगलातून जात होती. बाकी कुठे फाटेफुटे नाहीत अगदी सरळ वाट. साधारण पाऊण तासाने एका छोट्या हनुमान मंदिराजवळ पोहोचलो आणि आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री पटली.



मारुतीरायचं दर्शन घेतलं आणि ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घेऊन पुन्हा चालायला सुरुवात केली. आता वाट बऱ्यापैकी चढणीला लागत होती, त्यामुळे व्यवस्थित पाय लावत चढू लागलो. छोटे मोठे धबधबे पार करत, कधी निसरड्या पायऱ्या तर कधी निसरडे दगड पार करत चालत असताना तीन जणांचा एक ग्रुप उतरताना दिसला. सकाळी चढायला सुरुवात केल्या पासून झालेलं पाहिलं मनुष्य दर्शन😂😂😂 त्यांच्या कडून वाट बरोबर असल्याची खात्री करून घेतली. 5 मिनिटांत 2 वाटा दिसल्या, डावी वाट पाण्यातून जात होती तर उजवी थोडं चढण घेऊन डावीकडे वळत होती. उजवीकडची वाट धरून चढू लागलो आणि पुढच्या 5 मिनिटात एका मोठ्या धबधब्याने वाट अडवली. वर जायची वाट तर दिसत नव्हती, आणि हा इतका मोठा धबधबा चढून जाणं सुद्धा शक्य नव्हतं. मागे फिरून डावीकडे जायचा विचार मनात आला पण म्हटलं बघू तर थोडं पूढे जाऊन आणि थोड्या पाण्यातून पूढे गेलो आणि धबधबा जिथे कोसळतो तिथे जाऊन पोहोचलो आणि उजवीकडे जाणारी छोटी पाऊलवाट दिसली. मागे जायचा विचार तिथंच मनातून काढून टाकला आणि उजवीकडची वाट धरून चालू लागलो. वाट बऱ्यापैकी निसरडी होती त्यामुळे सावकाश पाय टेकवत पुढे सरकत होतो. दोन्ही बाजूला वाढलेलं गवत आणि माथेरान च्या लालभडक मातीची पायवाट आपण योग्य वाटेवर असल्याची जाणीव करून देत होती. साधारण १० मिनिटांतच एका सपाटीवर पोचलो आणि तोंडात बोट घातलं कारण मी जिथे उभा होतो तेच माझं लक्ष्य होत.






होय मी चक्क माथेरान च्या डोंगरावर पोहोचलो होतो. यो रॉक्स ने त्याच्या ब्लॉग वर लिहील्या प्रमाणे कधी पोहोचलो कळलं सुद्धा नाही. समोर दिसणाऱ्या पत्र्याच्या शेड मध्ये थोडा आराम केला आणि निघालो सनसेट पॉईंट कडे. शेड च्या बाजूने जाणारी पायवाट सनसेट पॉईंट कडे जात होती. 2 मिनिटांतच काही पायऱ्या उतरून एका रेलिंग जवळ आलो.






हीच ती माथेरान च्या सनसेट पॉईंट ची रेलिंग, रेलिंग खाली वाकून थोडं पुढे आलो बॅग ठेवली आणि बसलो निवांत. पाऊस अखंड कोसळत होताच आणि आश्चर्य म्हणजे तिथे मी एकटाच होतो. समोरचं दृश्य तर डोळ्याचं पारणं फेडत होता. तिन्ही बाजूला धुकं पसरलं होत, थोडा वेळ बसलो आणि धुक्याची चादर बाजूला झाली तसा थोडा पुढे गेलो.
समोर होता तो तुमचा आमचा सर्वांचा लाडका सह्याद्री. सह्याद्री चं दिसणारं हे रूप भन्नाट होत. खरंतर या पॉईंट ला सनसेट पॉईंट म्हणतात कारण इथून प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग च्या मध्ये असणाऱ्या V-shape मधून संध्याकाळचा सूर्यास्त होतो, मला तो V-shape पहायची खूप इच्छा होती पण बराच वेळ वाट पाहून सुद्धा पावसामुळे शक्य नाही झालं ते. शेवटी नाईलाजास्तव परत निघालो आणि शेड जवळ पोहोचलो, तिथे दोन पर्यटक होते त्यांना आजूबाजूला काही नाश्त्याची वगैरे सोय होईल का विचारलं तर ते म्हणाले की सरळ 15-20 मिनिटं चालत गेलो तर एक छोटंसं दुकान आहे तिथे मिळेल खायला. मग काय भूक तर होतीच निघालो त्या वाटेने!
दोन्ही बाजूने असणारी झाडं, त्याच्या मधोमध असणारा तो लालभडक मातीचा रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालणारा मी एकटा... असलं भारी वाटत होतं ना!! दहा मिनिटात एका झोपडीवजा स्टॉल जवळ पोहोचलो, खाण्यापिण्याची चौकशी केली तेव्हा कळलं की चहा आणि मॅगी मिळेल. चहा आणि मॅगी तयार होईपर्यंत थोडे फोटो काढले आणि निवांत राहिलो बसून.






माथेरान चं ते वातावरण भारीच होतं. अक्षरशः धोपटून काढणारा पाऊस, गार वारा, त्या लाल माती चा सुगंध सगळंच मस्त होतं. चहा आणि मॅगी खाऊन पुन्हा सनसेट पॉईंट ला जायला निघालो. नेरळ वरून उतरायचा विचार केलेला पण संध्याकाळी कर्जत आणि माथेरान च्या गर्दीने भरलेल्या लोकल ने जाण्यापेक्षा मला पनवेल चा प्रवास जास्त सोयीस्कर वाटला. पुन्हा एकदा सनसेट पॉईंट वर आलो. थोडा वेळ थांबून फोटो, विडिओ रेकॉर्डिंग करून उतरायला सुरुवात केली. फोटो वगैरे काढतांना छत्री उघडली होती, उतरताना मोबाईल, छत्री बॅग मध्ये टाकली, बॅग खांद्यावर लटकवली आणि उतरायला पाहिलं पाऊल टाकलं तोच सर्रकन पाय घसरला आणि मस्त नमस्कार घातला. नशिबाने बाजूचा झाडोरा हातात आला नाहीतर उजव्या बाजूला भली मोठी दरी आ वासून होतीच. फार लागलं वगैरे नाही म्हणून लगेचच सावकाश पुढे उतरायला सुरुवात केली. पाचेक मिनिटात त्या आधीच्या धबधब्या जवळ आलो आणि तिथून खाली उतरायला सुरुवात केली.
वर जाताना रस्ता चुकू नये म्हणून जिथं रस्ता चुकण्याचा संभव होता तिथं मी झाडांना लाल पट्टया बांधून ठेवल्या होत्या त्यामुळे निर्धास्त उतरत होतो.
उतरतांना मधेच एका ठिकाणी एक कुत्तू भेटला. गप्प गुमान बसले होता. मी माझ्याकडची थोडी बिस्किटं त्याला खाऊ घातली. खूष झाला लेकाचा.. मागेच लागला.. उतरताना आणखी २-४ वेळा साष्टांग दंडवत घातला. मी पडलो की तो येऊन लागलेला चिखल साफ आपल्या जिभेने साफ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा.




 सावकाश पावलं टाकत दोधानी मध्ये परतलो तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. मी बस कधी येणार याची चौकशी केली तर कळलं की 3 ची पनवेल बस आहे. वर खाल्लेली maggie अजून जिरली नव्हती तरी समोरच्या वडापाव च्या दुकानात एक वडापाव खाल्ला आणि मंदिराच्या बाहेर पार ओले झालेले बूट आणि मोजे काढले आणि निवांत बसून राहिलो. 3 ची बस ३:३० वाजता आली, अपेक्षेप्रमाणे बस मध्ये बसायला विंडो सीट मिळाली आणि पुन्हा दिवसभराचा छोटेखानी ट्रेक च्या आठवणींचा उजाळा करत पनवेल-कुर्ला-दादर-दहिसर करत 8 च्या आत घरी पोचलो.

Comments

Popular posts from this blog

राजधानी ते राजधानी

अलंग मदन "कुलंग"

भटकंती दुर्गत्रिकुटांची