सरळ आणि सोपा लोहगड...

२०१५ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात आमच्या रावा म्हणजेच "राव आमचं वेगळं आहे" या फेसबुक ग्रुप कम कुटुंबाने सर्व सभासदांना घेऊन लोहगड सर करायचा प्लान केला होता. माझ्या आयुष्यातला हा दुसराच ट्रेक होता म्हणून माझी उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली होती. नेहमी प्रमाणे आधी माझं नक्की नव्हतं आदल्या दिवशी माझं येन मी नक्की केलं. बाकी मेंबर्स चं जाणं नक्की होत त्यामुळे त्यांचं reservation आधीच करून ठेवलं होत आणि मला आयत्या वेळी reservation नाही मिळालं. रात्री कळलं कि मीनाक्षी सुद्धा येणारेय आणि तिचं पण reservation  नाही. मग तिच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही दोघांनी general  ने जायचं ठरवलं. सकाळी लवकर उठून सी.एस.टि. गाठलं आणि २ general च्या तिकीट काढून आम्ही आमच्या जागी जाऊन बसलो. थोड्याचं वेळात ट्रेन पुण्याकडे मार्गस्थ झाली. दादर आणि ठाण्याला आमची बाकीची मंडळी सुद्धा ठरलेल्या जागी विराजमान झाली. सकाळच्या वेळी अंधार कापत आमचा रथ पुढे जात होता. कर्जतला मस्त दिवाडकरांच्या वडापाव वर यथेच्छ ताव मारला. आणि ठरल्या वेळी लोणावळा स्टेशन ला पोहोचलो सुद्धा. लोणावळा वरून आम्हाला लोकल ने एक स्टेशन पुढे म्हणजेच मळवली ला जायचं होतं. लोणावळा वरून लोकल ने आम्ही मळवली कडे मार्गस्थ झालो. लोकल मध्ये आमची मस्ती चालूच होती त्यात भर म्हणजे योग्या आणि अज्जू चा बेबी डौल चा डान्स बघून तर सर्वांची हसून पुरेवाट झालेली.
मळवली ला उतरल्यावर पुण्यातले सुद्धा काही मेंबर्स आम्हाला सामील झाले. रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आम्ही गाडीरस्त्यावर चालायला सुरुवात केली. साधारण एक किलोमीटर पुढे गेल्यावर एका मोकळ्या मैदानात आम्ही पोटपूजा करून घेतील त्यासाठी आधीच कांदे-पोहे सज्ज होते. त्याचबरोबर रुपेश चा वाढदिवस सुद्धा साजरा केला. बऱ्यापैकी पोटपूजा केल्यावर आम्ही पुढे चालते झालो, जेवणाची व्यवस्था करायला म्हणून आम्ही मोजणी सुरु केली तर तब्बल ६८ जण मोजले गेले, लगेचचं लोहगडवाडीतल्या एका हॉटेल ला फोन करून तितक्या माणसांची जेवणाची सोय करायला सांगितली.
पुढे जात असताना डाव्या हाताला भाजे लेणी दिसली, लेणी खालून दिसायला अप्रतिम दिसत होती पण इतक्या जणांना वर लेणी बघायला न्यायचं म्हणजे वेळ बराच गेला असता म्हणून तिथे नं जात आम्ही लोहगडाकडे जण पसंत केलं. रस्ता बर्यापैकी मोठा होता म्हणजे एखादी गाडी आरामात जाऊ शकत होती. अज्जू प्रणव आधी बर्याचदा लोहगड ला येऊन गेले होते त्यामुळे त्यांना बरेच शॉर्टकट माहित होते, ते शॉर्टकट वापरून आमची ६८ जणांची गॅंग पुढे सरकत होती. पुढे एक जोडपे लिंबू सरबत विकताना दिसले, सर्वांनी लिंबू-सरबत पिऊन आणि थोडा आराम करून लोहगडाच्या दिशेने प्रयाण केलं. साधारण १० मिनिटांच्या चाली नंतर डावीकडे जाणारा एक कच्चा  रास्ता दिसला त्याबद्दल विचारले असता तो विसापूर किल्ल्याकडे जाणारा रास्ता असल्याचं कळलं. थोड्याच वेळात काही गाड्या आणि हॉटेल्स दिसली त्यावरून आपण लोहगडवाडीत पोहोचल्याची खात्री झाली. मगाशी फोन केलेल्या हॉटेल ला जाऊन जेवणाची व्यवस्था करून आम्ही किल्ल्यावर जायला वळलो.


किल्ल्याच्या पायऱ्या जिथून सुरु होतात तिथंच दुचाकींची गर्दी दिसली त्या गर्दीतून वाट काढत आमी पुढं आलो तर पायर्यांच्या दोन्ही बाजूला माकडं बसलेली दिसली, अनुभवी लोकांनी माकडांपासून बचावासाठी सोन्याच्या वस्तू तसंच खाण्याचे जिन्नस आपापल्या बॅग मध्ये टाकण्यास सांगितलं, आणि पुढचा प्रवास सुरु झाला. सर्पाकार आकाराच्या पायर्यांच्या रस्त्यावरून पुढे जात असताना एक दरवाजा लागला, त्याबद्दल विचारले असता असं कळलं कि याला गणेश दरवाजा म्हणतात. या दरवाज्याच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली एका दाम्पत्याचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याबद्दल त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. गणेश दरवाज्यातून पुढे आल्यावर आणखी एक दरवाजा दिसतो त्याला नारायण दरवाजा म्हणतात असं कळलं, याच्या बाजूला असणाऱ्या एका भुयारात भात आणि नाचणी साठवून ठेवली जायची, तिथे आत जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण काळोख असल्यामुळे काहीच दिसू शकलं नाही पुढं मागे फिरून थोडं वर गेलो तिथे थोडी मोकळी जागा दिसली, त्या मोकळ्या जागेत फोटोसेशन करून पुढे निघालो. पुढे आणखी एक दरवाजा दिसला त्याला हनुमान दरवाजा म्हणतात असं कळलं. थोडं आणखी पुढे गेल्यावर आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ पोहोचलो ज्याला महादरवाजा म्हटलं जात.
महादरवाज्यातून गडावर प्रवेश करताच एक दर्गा दिसला, दर्ग्याच्या बाजूला एक ध्वजस्तंभ उभा होता, आम्ही दर्ग्याच्या उजव्या बाजूला चालायला सुरुवात केली तिथे काही खोल्या दिसल्या, त्या भागाला लक्ष्मी कोठी असं म्हणतात. लक्ष्मी कोठी बघून आम्ही पुन्हा दर्ग्याजवळ आलो आणि तिथून पुढे जायला निघालो. दर्ग्यापासून पुढे गेल्यावर थोड्या उंच भागावर एक शिवमंदिर दिसले, तिथे दर्शन घेऊन आम्ही आमची गडफेरी सुरूच ठेवली. शिवमंदिराच्या मागच्या बाजूला एक अष्टकोनी तळे दिसले, तळ्यात उतरायला पायऱ्या होत्या. त्यात फारसे पाणी नव्हते, तिथे थोडा आराम करण्याचं ठरवलं आणि पाण्यात पाय सोडून बसलो, जानेवारी महिना असून सुद्धा भर दुपारी तिथलं पाणी बऱ्यापैकी गार होतं.
थोड्या वेळच्या विश्रांती नंतर आम्ही उर्वरित गड बघायला निघालो. तळ्याच्या थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आणखी एका तळ्याशी आमची गाठ पडली, हे तळे १६ कोनी होते आणि याची निर्मिती नाना फडणवीसांनी केल्याचं कळलं. इथून पुढे गेलो आणि खाली जाणारी छोटी पायवाट होती. इथून समोर एक मस्त पॉईंट दिसत होता, त्याला विंचूकाटा म्हणतात म्हणतात असं कळलं. गडाच्या आजुबाजूचा परिसर



न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. आम्ही जिथून उभे होतो तिथून तो भाग विंचवाच्या नांगीसारखा भासत होता म्हणून त्याला विंचूकाटा म्हणतात. आम्हाला वेळेचं बंधन होत आणि अजून पेटपूजा बाकी होती म्हणून विंचूकाट्याकडे नं जाताच आम्ही माघारी वळलो. खाली उतरून लोहगडवाडीत जेवण उरकलं आणि ट्रॅक्स ने लोणावळा गाठलं. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तचं उशीर झालेला त्यामुळे ट्रेन सुटते कि काय अशी भीती वाटतं होती, पण आमच्या सारखीच ट्रेन सुद्धा उशिराने आहे हे कळल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. लोणावळ्याला पोहोचल्यावर पुणेकरांचा निरोप घेऊन आणि एक ग्रुप फोटो काढून आम्ही मुंबईकडे रवाना झालो.

Comments

Popular posts from this blog

राजधानी ते राजधानी

अलंग मदन "कुलंग"

भटकंती दुर्गत्रिकुटांची